आरसीबीचे चिन्नास्वामीवर पुनरागमन...

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
बेंगळुरू,
RCB comeback on Chinnaswamy आयपीएल २०२६ पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या समर्थकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. गतवर्षी विजेतेपद पटकावलेल्या या संघाने यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे बहुतांश सामने खेळण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संघ पाच सामने आपल्या पारंपरिक मैदानावर खेळणार असून उर्वरित दोन सामने रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होतील.मागील हंगामात विजयानंतर मैदानाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे या मैदानावरील सामन्यांबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्या घटनेत अकरा जणांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर येथे कोणतीही मोठी देशांतर्गत स्पर्धा घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आयपीएल २०२६ मध्ये संघाला आपल्या घरच्या मैदानावर खेळण्याची परवानगी मिळेल की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले होते.
 
 

RCB comeback  
संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले की आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून आणि सर्व परवानग्या मिळवल्यानंतर बेंगळुरूत सामने घेण्यास मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकार, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि पोलिस प्रशासन यांच्या सहकार्याने सुरक्षा तसेच इतर आवश्यक सुविधा सिद्ध करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.संघाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी राजेश मेनन यांनी सांगितले की, चिन्नास्वामी हे केवळ खेळाचे मैदान नसून संघाच्या ओळखीचा अविभाज्य घटक आहे. येथील प्रेक्षकांचा उत्साह खेळाडूंना नेहमीच ऊर्जा देतो. कठीण प्रसंगीही चाहत्यांनी साथ दिली असून त्यांना पुन्हा घरच्या मैदानावर सामने पाहण्याची संधी मिळणे योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी राज्य सरकार, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि पोलिस दलाचे आभारही मानले. या हंगामातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजेविराट कोहलीचे या मैदानावर पुनरागमन. कोहलीचे चिन्नास्वामीशी जिव्हाळ्याचे नाते असून बेंगळुरूतील प्रेक्षक त्याला नेहमीच भरभरून प्रतिसाद देतात. त्यामुळे आगामी सामन्यांत पुन्हा एकदा त्याच्या नावाचा जयघोष दुमदुमेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.