माळेगाव तलावात दोन युवक बुडाले

धुळवडची अंघोळ जिवावर बेतली

    दिनांक :04-Mar-2026
Total Views |
अमरावती,
youths-drowned-in-malegaon-lake : रंग खेळल्यावर आपल्या मित्रांसह अंघोळीसाठी भानखेडा परिसरातील माळेगाव तलावावर गेलेले दोन युवक पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. त्यात त्या दोघांचाही करुण अंत झाला. ही दुर्दैवी घटना धुलिवंदनाच्या दिवशी मंगळवार, ३ मार्चला दुपारनंतर ४.३० वाजताच्या सुमारास घडली.
 
 
j
 
 
 
अनुज नितीन खडेकार (२०) व कार्तिक प्रदीप राऊत (१९) दोघेही रा. मुदलियारनगर, अमरावती अशी मृतांची नावे आहेत. अनुज व कार्तिक हे दोघे आपल्या अन्य सहा मित्रांसह धुलिवंदनाच्या दिवशी मंगळवारी दुपारनंतर ४ वाजताच्या सुमारास रंग खेळून अंघोळीसाठी भानखेडा परिसरातील माळेगाव तलावावर गेले होते. ते सर्व अंघोळीसाठी तलावातील पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने अनुज व कार्तिक बुडाले. हा प्रकार अन्य मित्रांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे मित्रांनी घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी पोलिसांनी अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाला पाचारण केले. शोध व बचाव पथकाने अथक परिश्रम करून दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढले. त्यानंतर मृतदेहांना शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेने परिसरात शोककळा पसरील आहे.