कोलकाता,
Alan performed a feat. ४ मार्च रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे झालेल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक लढत रंगली. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने १६९ धावांचे आव्हान उभे केले. मात्र न्यूझीलंडने हे लक्ष्य केवळ १२ षटके आणि पाच चेंडूत पार करत दणदणीत विजय मिळवला आणि २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा प्रवेश केला.
या विजयाचा खरा शिल्पकार ठरला न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलन. २६ वर्षीय अॅलनने अवघ्या ३३ चेंडूत शतक झळकावत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्याच्या खेळीत १० चौकार आणि ८ षटकारांचा समावेश होता. या सामन्यातील आठ षटकारांमुळे स्पर्धेत त्याच्या षटकारांची एकूण संख्या २० वर पोहोचली आणि एका विश्वचषक स्पर्धेत २० षटकारांचा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.
यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायर यांच्या नावावर होता. त्यांनी एका स्पर्धेत १९ षटकार ठोकले होते. मात्र अॅलनने हा टप्पा ओलांडत नवा इतिहास घडवला. एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीतही अॅलनने आपले स्थान मजबूत केले आहे. या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल आघाडीवर असून, अॅलन त्याच्या जवळ पोहोचला आहे. अॅलनच्या आक्रमक फलंदाजीमुळे न्यूझीलंडने केवळ विजयच मिळवला नाही, तर विश्वविक्रमाची नोंदही आपल्या नावावर केली. त्याच्या या ऐतिहासिक खेळीची क्रिकेटविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.