राज्यसभेसाठी काँग्रेकडून सहा उमेदवारांची घोषणा

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Congress announces six candidates भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकांसाठी सहा उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. या यादीत ज्येष्ठ विधिज्ञ आणि पक्षातील वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून त्यांना तेलंगणामधून उमेदवारी देण्यात आली आहे. सिंघवी सध्या त्याच राज्यातून राज्यसभेचे सदस्य आहेत. तेलंगणातील दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दुसऱ्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय व्ही. नरेंद्र रेड्डी यांनाही पक्षाने मैदानात उतरवले आहे.
 
 
Congress announces six candidates
 
 
छत्तीसगडमधून विद्यमान सदस्य फुलो देवी नेताम यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कांगडा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष अनुराग शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हरियाणामधून कर्मवीर सिंह बौद्ध यांना तर तामिळनाडूमधून एम. क्रिस्टोफर तिलक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. दरम्यान, बिहारच्या राजकारणातही मोठी हालचाल दिसून येत आहे. अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार आज राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते सकाळी विधानसभेत जाऊन अर्ज सादर करतील, अशी माहिती आहे. त्यांच्यासोबत जनता दल (युनायटेड) कडून रामनाथठाकूर हेही उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या प्रक्रियेदरम्यान अमित शहा उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
 
नितीश कुमार दिल्लीतील राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याने बिहारमध्ये नवीन नेतृत्वाबाबत चर्चांना वेग आला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. तसेच नितीश कुमार यांचा मुलगाही राजकारणात प्रवेश करू शकतो, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पाटणा येथे झालेल्या बैठकीत पुढील राजकीय वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे समजते.