युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोने स्वस्त!

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Gold is cheap सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज बाजार उघडताच सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय घट दिसून आली. दहा तोळे सोन्याच्या दरात तब्बल नऊ हजार आठशे रुपयांची घट झाल्याने सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. मागील काही दिवसांपासून मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे सोन्याचे दर वाढतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात उलट परिस्थिती निर्माण होत असून दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 
 

gold
 
माहितीनुसार, चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आज एक तोळा चोवीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे तीस रुपये मोजावे लागत आहेत. दहा तोळे सोन्याच्या दरात नऊ हजार आठशे रुपयांची घट झाली असून ते खरेदी करण्यासाठी सुमारे सोळा लाख पस्तीस हजार तीनशे रुपये खर्च करावे लागणार आहेत.त्याचप्रमाणे बावीस कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घट झाली आहे. एक तोळा बावीस कॅरेट सोन्याच्या किमतीत नऊशे रुपयांची घट झाली असून त्यासाठी सुमारे एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे रुपये मोजावे लागत आहेत. दहा तोळे बावीस कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे नऊ हजार रुपयांची घट झाली आहे आणि ते खरेदी करण्यासाठी जवळपास चौदा लाख नव्याण्णव हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
 
 
चोवीस आणि बावीस कॅरेट सोन्याप्रमाणेच अठरा कॅरेट सोन्याच्या किमतीतही लक्षणीय घट झाली आहे. अठरा कॅरेटच्या एका तोळा सोन्याच्या दरात सातशे तीस रुपयांनी घट झाली असून त्यासाठी सुमारे एक लाख सत्तावीस हजार दोनशे पासष्ट रुपये मोजावे लागत आहेत. दहा तोळे अठरा कॅरेट सोन्याच्या दरात सात हजार तीनशे रुपयांची घट झाली असून ते खरेदी करण्यासाठी सुमारे बारा लाख सव्वीस हजार पाचशे रुपये खर्च करावे लागणार आहेत.देशातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याच्या दरात घट नोंदवली गेली आहे. मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद येथे चोवीस कॅरेट सोन्याचे दर साधारणपणे एक लाख त्रेसष्ट हजार तीनशेच्या आसपास आहेत, तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये किंचित फरक दिसून येत आहे. बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट सोन्याच्या किमतींमध्येही जवळपास अशीच घसरण दिसून येत आहे.