मुंबई,
india-vs-england-semifinal-2026 मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे होणाऱ्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या अंतिम अकराबाबत चर्चा रंगू लागली आहे. इंग्लंडविरुद्धच्या या महत्त्वाच्या लढतीसाठी संघात काही बदल होणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. विशेषतः वरच्या फळीतील फलंदाजी ही सध्या भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने केलेल्या ९७ धावांच्या शानदार खेळीमुळे संघाला काहीसा दिलासा मिळाला. त्या सामन्यात अभिषेक शर्मा अवघ्या ११ चेंडूत १० धावा करून बाद झाला, तर इशान किशन देखील १० धावांवर माघारी परतला, त्यामुळे संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती.

स्पर्धेतील पुढील टप्प्यात झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनचे पुनरागमन झाले. त्यापूर्वी नामिबियाविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आजारी असल्यामुळे त्याला संधी मिळाली होती. india-vs-england-semifinal-2026 सॅमसन संघात परतल्यानंतर फलंदाजीच्या क्रमात काही बदल करण्यात आले. इशान किशनला खालच्या क्रमांकावर खेळावे लागले, तर अभिषेक शर्मा सलामीला कायम राहिला. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने अर्धशतक झळकावले असले तरी त्याआधीच्या सामन्यांतील त्याचा फॉर्म समाधानकारक नव्हता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यासारख्या निर्णायक टप्प्यात संघ व्यवस्थापन कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साधारणपणे भारतीय संघ महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी मोठे बदल टाळतो, कारण अशा निर्णयांवर संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
दरम्यान, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही संभाव्य अंतिम अकराबाबत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, खेळाडूंच्या सध्याच्या कामगिरीचा विचार करून संघ व्यवस्थापनाने आवश्यक बदल करण्यास मागेपुढे पाहू नये. जर अभिषेक शर्मा अपेक्षित लयीत दिसत नसेल आणि सतत कमी धावा केल्यामुळे त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असल्याचे जाणवत असेल, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. स्पर्धेत आतापर्यंत त्याने सहा डावांत केवळ ८० धावा केल्या असून त्याची सरासरीही फारशी प्रभावी नाही. रवी शास्त्री यांच्या मते, बदलाचा विचार केल्यास इशान किशन आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात करणे हा पर्याय संघासाठी फायदेशीर ठरू शकतो. india-vs-england-semifinal-2026 तसेच रिंकू सिंग याला अंतिम अकरात स्थान देऊन खालच्या फळीत आक्रमक फलंदाजीची जबाबदारी दिली जाऊ शकते. या स्पर्धेत इशान किशनने सात डावांत २२४ धावा करत चांगली कामगिरी केली आहे आणि सलामीला खेळताना त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. मात्र सॅमसन संघात परतल्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली.
अभिषेक शर्माचा इंग्लंडविरुद्धचा भूतकाळातील विक्रम मात्र उल्लेखनीय आहे. गेल्या वर्षी याच वानखेडे मैदानावर झालेल्या एका सामन्यात त्याने ५४ चेंडूत १३५ धावांची झंझावाती खेळी केली होती. त्यामुळे त्याला पूर्णपणे बाहेर ठेवावे, असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केलेले नाही. त्यांच्या मते भारतीय फलंदाजी आधीच मजबूत आहे आणि संघ इच्छित असल्यास अभिषेकवर विश्वासही ठेवू शकतो. आता सर्वांचे लक्ष भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाकडे लागले आहे. अनुभव आणि मागील कामगिरीला प्राधान्य दिले जाईल की सध्याच्या फॉर्मनुसार धाडसी निर्णय घेतला जाईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वानखेडेवरील हा सामना भारताला अंतिम फेरीचा मार्ग दाखवणारा ठरू शकतो, त्यामुळे अंतिम अकराची निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (इंग्लंडविरुद्ध): इशान किशन, संजू सॅमसन, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग/अभिषेक शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.