जम्मू,
India will ask for help from China जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थाने महत्त्वाची पायरी उचलत चीनकडून मदत मागण्याचा निर्णय घेतला आहे. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या एका विशेष कॅमेऱ्याचा धागा चीनपर्यंत पोहोचल्याने या तपासात प्रथमच चीनच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की हल्ल्यापूर्वी परिसराची पाहणी करण्यासाठी या कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला असावा. त्यामुळे हा कॅमेरा सर्वप्रथम कोणाच्या हातात होता, तो कुठे वापरला गेला आणि शेवटी तो दहशतवाद्यांपर्यंत कसा पोहोचला याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात जम्मूमधील विशेष न्यायालयाने परदेशातील न्यायिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास परवानगी दिली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार तपास अधिकाऱ्यांनी परराष्ट्र मंत्रालयामार्फत चीनमधील संबंधित अधिकाऱ्यांना औपचारिक विनंती पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन देशांदरम्यान असलेल्या परस्पर कायदेशीर सहकार्याच्या करारानुसार ही विनंती अधिकृत मार्गाने पाठवली जाणार आहे. यामुळे कॅमेऱ्याचा पहिला खरेदीदार, त्याचा वापर आणि त्यासंबंधीची तांत्रिक माहिती मिळवणे शक्य होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तपासादरम्यान संबंधित कॅमेरा तयार करणाऱ्या गोप्रो या अमेरिकन तंत्रज्ञान कंपनीलाही नोटीस देण्यात आली होती. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा कॅमेरा चीनमधील एका वितरकाकडे पाठवण्यात आला होता आणि तो सर्वप्रथम चीनमधील डोंगगुआन शहरात सक्रिय करण्यात आला होता. मात्र त्यानंतर हा कॅमेरा कोणाकडे गेला किंवा तो कसा वापरला गेला याची माहिती कंपनीकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर कॅमेऱ्याचा मागोवा घेण्यासाठी आणि त्याच्या वापराबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी चीनमधील अधिकाऱ्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे तपास संस्थेने न्यायालयाला सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर माहितीची देवाणघेवाण होणार असून हल्ल्यामागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी तपास अधिक वेगाने पुढे नेला जाणार आहे.