कॅनडात भारतीय इन्फ्लुएन्सरची निर्घृण हत्या

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
ओटावा,
Indian influencer murdered in Canada कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका लोकप्रिय इन्फ्लुएन्सरची हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नॅन्सी ग्रेवाल नावाची ही ४५ वर्षांची महिला समाजमाध्यमांवर अत्यंत सक्रिय होती आणि तिचे अनेक फॉलोअर्स होते. तिच्या निधनाच्या बातमीमुळे मनोरंजन क्षेत्रासह समाजमाध्यमांवरही शोक आणि संतापाची भावना व्यक्त होत आहे. कॅनडातील विंडसर शहरातील टॉड लेन परिसरात नॅन्सी ग्रेवाल राहत होती. त्याच घरात अज्ञात हल्लेखोराने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
 

Indian influencer 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी अवस्थेतील नॅन्सी ग्रेवाल यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता याचा शोधही घेतला जात आहे. परिसरातील देखरेख कॅमेऱ्यांचे चित्रफिती तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणाबाबत अधिकृत तपशील जाहीर केलेला नसला तरी सर्व शक्य बाजूंनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
या घटनेनंतर कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय आणि पंजाबी समाजातील लोकांनी चिंता आणि संताप व्यक्त केला आहे. नॅन्सी ग्रेवाल या पंजाबी भाषेत विविध विषयांवर आपली मते मांडणाऱ्या आणि वेगवेगळे व्हिडिओ तयार करणाऱ्या लोकप्रिय समाजमाध्यम निर्मात्या होत्या. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला होता. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे.