महाराजस्व समाधान शिबिरातून नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
जिल्हाधिकार्‍यांची पत्रपरिषदेत माहिती
मार्च ते मे कालावधीत मंडळ स्तरावर आयोजन
 
वर्धा, 
छत्रपती शिवाजी महाराज 'Maharajaswa Abhiyan' महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर अभियान टप्पा-१ राबविण्यात येत असून तालुकानिहाय मंडळ स्तरावर ७ मार्च ते १५ मे या कालावधीत जिल्ह्यात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाराजस्व समाधान शिबिरातून नागरिकांच्या समस्या तसेच प्रकरणांचा तत्काळ निराकरण करण्यात येणार असून शासनाच्या योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आज गुरुवार ५ रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
rajasw
 
सदर शिबिरात ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांना मध्यवर्ती मानून शासनाच्या विविध सेवा शिबिरस्थळी दिल्या जाणार आहेत. यात प्रामुख्याने जिवंत सातबारा, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेल्या व्यवहाराचे नियमन, विविध दाखल्यांचे वाटप, पांदण रस्ते, सर्वांसाठी घरे अंतर्गत घरकुलसाठी पट्टे वाटप, प्रलंबित फेरफार निकाली काढणे,वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रुपांतर करणे, भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणे, डिजिटल सातबारा उतारा वितरण, तक्रार निवारण, ई-मोजणी, अ‍ॅग्रीस्टॅक, पीएम किसान योजना या सुविधांचा लाभ दिला जाणार असून याच शिबिरात शासनाने जनतेच्या सोयीसाठी महसूल विभागात घेतलेल्या विविध निर्णयांची व सुधारणांची माहिती देऊन सर्वसामान्य जनतेस व शेतकर्‍यांना प्रशिक्षितही केले जाणार आहे. या शिबिरात नागरिकांच्या सुविधेसाठी ‘हेल्प डेस्क’ आणि ‘एक खिडकी योजना’ राबविली जाणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यावेळी दिली.
 
 
'Maharajaswa Abhiyan'  या अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे. मार्च मध्ये ७ ते १४, एप्रिलमध्ये १० ते १७ आणि मे महिन्यात ८ ते १५ मे दरम्यान तालुकानिहाय नियोजित संबंधित मंडळ स्तरावर सदर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करणे हा या उपक्रमाचा उद्देश असून जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, उपजिल्हाधिकारी रमा जोशी, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड आदी उपस्थित होते.
 
 

'Maharajaswa Abhiyan'  शासनाचे निर्णय आणि लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रचार-प्रसार केला जाणार आहे. यासाठी सरपंच, संजय गांधी तालुका समितीचे पदाधिकारी काम करतील. पांदण रस्त्यांबाबत सर्वे करून ऑनरेकॉर्ड घेतले आहेत. त्यांना युनिक आयडी दिली आहे. पहिल्या वर्षांत २० टके पांदण रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजित असून डीपीडीसी, मनरेगा आदी निधीतून ही कामे केली जाणार आहे. पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे कामेही केले जाणार आहे.सिलिंगमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या असून पट्टे वाटपाचे नवीन धोरणही असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.