अग्रलेख
morale service country आज जगात ज्या पद्धतीने संघर्ष आणि युद्धे सुरू आहेत, त्यावरून ‘शांतता’ हा शब्द केवळ शब्दकोशातच उरलाय की काय, अशी शंका येते. जग अधिक सभ्य होतेय की रानटी, असा प्रश्न पडण्यासारखी ही स्थिती. लढण्याचा, आक्रमणाचा तर्क प्रत्येकाकडे तयार. पण, संयमाची वाणवा. सुरुवातीला रशिया-युक्रेन युद्ध म्हणजे आठवड्यात संपणारा खेळ वाटला होता, पण तो आता रेंगाळलेला विषय झालाय. अमेरिका, इस्रायल आणि इराण या त्रिकोणी संघर्षाने त्यात ‘तेल’च ओतले आहे. इराणची तयारी पाहता हे युद्ध केवळ क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित न राहता, जागतिक अर्थव्यवस्थेच्या मुळावर येणार, असे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई ठार झाल्यानंतर इराणनेही ताकदीने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियातील सरकारी मालकीचा सर्वांत मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प तात्पुरता बंद करावा लागला. या बंदीच्या बातमीनंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 9.32 टक्क्यांनी वाढल्या. सध्याच्या काळात जगातला प्रत्येक देश एकमेकांशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जोडला गेला आहे. कुठेही ठिणगी पडली की त्याची झळ कमी-जास्त प्रमाणात सर्वांना बसतेच. सध्या सुरू असलेली युद्धे त्याला अपवाद नाही. हे युद्ध पुरवठा साखळीवर घाला घालणारे आहे. तेल आणि गॅसचे भाव वाढले की, भाजीवाल्यापासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांचेच बजेट कोलमडणार. भारताकडे जरी काही दिवसांचा इंधन साठा असला आणि आपण आयातीचे इतर मार्गही मोकळे ठेवले आहे असे म्हणत असलो, तरी महागाईचा राक्षस कुणालाही सोडणार नाही. अशा वेळी आमचं कसं होणार, असा टाहो फोडण्यापेक्षा, आपण आपल्या वागण्यात थोडी शिस्त, धैर्य आणि संयम आणण्याची गरज आहे. सरकार आपल्या हिताचा सर्वार्थाने विचार करते आहे. बेंबीच्या देठापासून निरर्थक प्रश्न विचारण्यापेक्षा देशहित कशात आहे, याचा विचार करणे सर्वांसाठी योग्य.
आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या देशात स्वाभिमान आणि सुरक्षा संकटात असते, तिथे नागरिकांची खरी परीक्षा असते. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध इतक्यात संपेल असे वाटत नाही. ते केव्हा संपेल हेही सांगता येत नाही. पुढच्या काळात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. अशा वेळीच देशातील नागरिकांच्या धैर्य आणि संयमाची परीक्षा असते. भारतीयांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. देश जेव्हा अशा कोणत्याही संकटात असतो तेव्हा देशासोबत उभे राहणे, देशावर अनावश्यक ताण येणार नाही असे वर्तन करणे हे जबाबदार नागरिकांचे लक्षण. एखाद्या गोष्टीची टंचाई निर्माण झाली तर आरडाओरड करण्यापेक्षा संयम दाखवणे, प्रसंगी पर्यायांचा वापर करणे, नजीकच्या ठिकाणी पायी जाण्याचा प्रयत्न करणे हीसुद्धा येत्या काळात देशसेवा ठरणार आहे.
भारतीय जनतेने अशा संकटांचा सामना यापूर्वीही केलेला आहे. जेव्हा केव्हा असे संकट देशावर आले, तेव्हा जनतेने तेवढ्याच जबाबदारीने, प्राणपणाने प्रतिसाद दिला आहे. 1965 च्या युद्धात जेव्हा अमेरिकेने भारताला गव्हाची निर्यात थांबविण्याची धमकी दिली, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी देशाला एक वेळचे जेवण बंद करण्याचे आवाहन केले. त्याही आधी तो प्रयोग त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात केला. पत्नीला- ललिता देवींना त्यांनी सांगितले की, आजपासून आपण एक वेळचे जेवण बंद करू या! त्यांच्या परिवाराने तो त्याग केला तेव्हाच त्यांनी देशाला सांगितले. पुणेकरांनी तर तेव्हा हॉटेलबाहेर फलक लावले होते- ‘आज शास्त्रीजींसाठी हॉटेल बंद!’ एका हाकेवर संपूर्ण देशाने पोटाला चिमटा घेतला आणि लष्कराला बळ दिले. याचा अर्थ, शास्त्रीजींनी देशाला उपाशी ठेवले असा होत नाही, तर देशाला स्वाभिमानी कसे राहायचे हे त्यांनी शिकवले. देशावरचे संकट हे आपले संकट असते, हे त्यांनी अधोरेखित केले. आज आपण इंधन वापरात संयम दाखवला तर तीही आपली ‘शास्त्री-वृत्ती’ ठरेल.
तत्पूर्वी, हिमालयाच्या सीमा रक्ताने माखल्या जात असताना आणि देशाच्या तिजोरीत खडखडाट असताना, मुख्यमंत्री मा. सा. कन्नमवार यांनी, सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांन महाराष्ट्राला साद घातली होती- ‘माझ्या रक्ताच्या बांधवांनो, देश संकटात आहे. हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्रीला धावून जावे लागेल.’ त्या हाकेचा असा काही चमत्कार झाला, जो या मराठी मायभूमीचा इतिहास आजही अभिमानाने सांगितला जातो. लष्कराच्या शस्त्रास्त्रांसाठी नागपूरपासून पुण्यापर्यंत आणि मुंबईपासून कोल्हापूरपर्यंतच्या नागरिकांनी त्यांच्याकडचे सोने दान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. एका सभेत एका माउलीने केवळ तिचे दागिने दिले नाहीत, तर आपले मंगळसूत्रही काढून मा. सा. कन्नमवार यांच्या हाती ठेवले होते. त्याही काळी महारष्ट्राने तब्बल पाच कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोने आणि रोख रक्कम संरक्षण निधीसाठी दान दिले होते. अशी उदाहरणे कमी नाहीत. अलिकडच्या काळात कोविडने जेव्हा अवघ्या जगाला आपल्या विळख्यात घेतले, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संयम आणि धैर्याचे आवाहन केले. ‘लॉकडाऊन’च्या काळात घरातील पिंजऱ्यात राहूनही भारतीयांनी जो संयम दाखवला, तो पुढे जगासाठी अभ्यासाचा विषय ठरला. अखेर कोविडवर आपण सर्वांनी मात केली.
युद्ध फक्त सीमेवरच लढले जाते असे नव्हे. ते घराघरातल्या बचतीच्या पातळीवरही लढले जाते. दुसèया महायुद्धानंतर जपान पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना तिथे इंधनाची इतकी टंचाई होती की, लोक मोठ्या प्रमाणात सायकलचा वापर करू लागले. एकाही जपानी नागरिकाने रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध आरडाओरड केली नाही. उलट प्रत्येकाने ठरवले की, मी देशासाठी दिवसाला किमान 10 मिनिटे जास्त काम करेन! त्यांनी त्या पलीकडे काम केले. आजही करताहेत. परिणाम आहे आजचा विकसित जपान. अशी असते देशभक्ती. तेलाचा साठा मर्यादित असताना, तो अधिक महाग होत असताना, आपली गाडी ‘सिग्नल’ला बंद करणे किंवा विनाकारण गाडी बाहेर न काढणे ही देखील देशसेवाच. केवळ मौज म्हणून ‘लाँग ड्राईव्ह’वर न जाणे हेही येत्या काळात देशासाठी काहीतरी केल्याचे समाधान देणारे ठरणार आहे. शक्य तिथे पायी जाणे किंवा पर्यायी छोटे वाहन वापरणे एवढे तरी प्रत्येकाने केले पाहिजे. उद्या तेल मिळणार नाही, या अफवेने घाबरून डबेच्या डबे भरून ठेवणे ही आप्पलपोटी वृत्ती संपविली पाहिजे. आखाती देशांत युद्ध असेच सुरू राहिले, तर प्रति बॅरल 10 ते 20 डॉलर्सची वाढ होणे अपेक्षित आहे. पुढे ती आणखी वाढू शकेल. तेलाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली की, घाऊक महागाईचा दर साधारण 1 टक्क्याने वाढतो. याचा अर्थ, आपल्या ताटातील भाजी आणि डाळ महागणार आहे. तेल-मीठही महाग होऊ शकते. सध्या विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पदूर येथे इंधनाचे तेल साठविण्याची सोय आहे. सुमारे 5.33 दशलक्ष मेट्रिक टन एवढ्या कच्च्या तेलाचा आपल्याकडे साठा आहे, जो साधारण 10 दिवस पुरू शकतो. या व्यतिरिक्त तेल कंपन्यांकडे 64 दिवसांचा साठा असतो. अशाप्रकारे साधारण 74 दिवस आपण तग धरू शकतो, असे सांगितले जात आहे. पण त्यानंतर काय, हा प्रश्न आहेच. तोवर युद्ध संपून पुरवठा साखळी सुरळीत झाली तर ठीक. अन्यथा, परिस्थिती सामान्य होईपर्यंत संयम आणि धैर्यच आपल्या कामी येणार आहे.
देशात अशी स्थिती निर्माण होते तेव्हा हक्क गाजवण्यापेक्षा कर्तव्य बजावण्यात जास्त मोठेपण असते. आरडाओरड करून भाव कमी होत नाहीत. सोशल मीडियावर कितीही पोस्टी डकवल्या तरी युद्ध लगेच थांबणार नाही. प्रत्येकाने संयम राखल्यास देशाचे मनोबल नक्कीच वाढेल. मनोबल राखणे आणि ते वाढविणे ही देखील देशसेवाच आहे!