हैदराबाद
Rashmika Mandanna Vijay Deverakonda पॅन-इंडियन अभिनेत्री रश्मिका मंदान्ना Rashmika Mandanna आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा Vijay Deverakonda यांच्या विवाहानंतर आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा बुधवारी सायंकाळी हैदराबादमधील बंजारा हिल्स परिसरात पार पडला. २६ फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकलेल्या या लोकप्रिय जोडप्याच्या सत्कार समारंभाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती.
या सोहळ्यात दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार आणि मान्यवरांनी हजेरी लावली. कार्यक्रमातील काही छायाचित्रे आणि चलतचित्रे समाजमाध्यमांवर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.
सत्कार सोहळ्यात रश्मिका मंदान्नाचा देखणा आणि पारंपरिक पोशाख विशेष चर्चेत राहिला. तिने सोनेरी किनार असलेली लाल रेशमी साडी नेसली होती. दक्षिण भारतीय पद्धतीने नेसलेल्या या साडीमुळे तिचा देखणा आणि राजेशाही असा लूक अधिक खुलून दिसत होता. या पोशाखासोबत तिने जड सोन्याचे दागिने परिधान केले होते. कानातले, जाड हार आणि सोन्याचे बांगडे यामुळे तिचा साज अधिक उठावदार दिसत होता. केसात फुलांनी सजवलेला अंबाडा केल्यामुळे तिचा पारंपरिक साज अधिक आकर्षक झाला होता.विजय देवरकोंडाचा पोशाखही उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. त्याने फिकट पांढऱ्या रंगाचा पारंपरिक दक्षिण भारतीय पोशाख परिधान केला होता. कुर्ता आणि त्याला साजेशी धोती असा त्याचा पोशाख होता. यासोबत परिधान केलेल्या हारामुळे त्याचा साज अधिक देखणा दिसत होता.
या भव्य सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेता नागार्जुन अक्किनेनी Nagarjuna Akkineni पत्नीसमवेत उपस्थित होते. तसेच अभिनेता नागा चैतन्य Naga Chaitanya यानेही या समारंभात हजेरी लावली. दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमात सहभागी होत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.रश्मिका आणि विजय यांची जोडी चित्रपटप्रेमींमध्ये अत्यंत लोकप्रिय मानली जाते. त्यांच्या विवाहानंतर आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्याचे छायाचित्रे आणि चलतचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पाहिली जात असून चाहत्यांकडून नवदाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.