...आई, माझी लेक स्वरा कुठे आहे गं...

- स्फोटात जखमी सीमाचा केविलवाणा सवाल

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
sbl company ‘माझी लेक स्वरा कुठे आहे गं... ती कशी आहे...ती जेवण करते नं... मी दिसत नाही म्हणून रडत तर नाही नं...’ असे एका पाठाेपाठ अनेक प्रश्न वृद्ध आईला कंठ दाटून येईपर्यंत विचारणाऱ्या सीमा धुर्वे विचारते. तीन वर्षांच्या मुलीची आई असलेली सीमा ही राऊळगावमधील एसबीएल कंपनी झालेल्या स्फोटात गंभीररित्या जखमी असून रुग्णालयात जीवन-मृत्यूशी संघर्ष करीत जखमांमधून सावरत आहे.
 
 

सीमा  
 
 
नांदा शिंदे गावातील सीमा (24) हिचा विवाह झिल्पी येथील ड्रायव्हर असलेल्या विजय धुर्वे याच्याशी झाला. दाेघांनीही गरिबीत संसार सुरु केला. घरातील अठराविश्व दारिद्र्याशी दाेघेही पती-पत्नीने दाेन-दाेन हात करण्यासाठी संघर्ष सुरु केला. विजय वाहन चालविण्यासह शेतीत माेलमजुरी करायला लागला तर लग्न झाल्यानंतर पाचव्याच दिवशी सीमासुद्धा माेलमजुरीसाठी बाहेर पडली. त्यांच्या संसार वेलीवर स्वरा नावाचे फुल उमलले. झाेपडीत चंद्र उगविल्यासारखी स्वरा आल्यामुळे घरात आनंदी-आनंद हाेता. मात्र, पुन्हा घरातील आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा माेलमजुरीकडे वळावे लागले. तीन वर्षांच्या स्वराला माहेरी आई रमाबाई यांच्याकडे ठेवले. बाेबडे बाेल बाेलणाऱ्या स्वराला आईकडे ठेवून कापडात शिदाेरी बांधून एसबीएल कंपनीत सीमा कामाला जाऊ लागली. पाेटाची खळगी भरावी यासाठी सीमा आपल्या काळजाच्या तुकड्याला दिवसभर डाेळ्याच्या नजरेआड ठेवून काबाडकष्ट करीत हाेती. दुसरीकडे पतीसुद्धा कामावर जाऊन फाटलेल्या घराला ठिगळं लावण्यासाठी हातभार लावत हाेता. बिकट परिस्थितही सीमा आणि विजय यांनी हार न मानता पुन्हा संसार उभा केला. मुलीच्या भविष्यासाठी पै-पै जमा करण्याचा निर्धार केला.sbl company मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. एसबीएल कंपनीत रविवारी झालेल्या स्ाेटात सीमा भाजल्याने गंभीर जखमी झाली. तिचा चेहरा, हात-पाय आणि पाेटाचा भागही बराच भाजल्या गेला. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, तीन वर्षांच्या मुलीपासून गेल्या चार दिवसांपासून दूर असलेली सीमा लेक स्वराची एक झलक बघण्यासाठी आतुरलेली आहे. ती वारंवार आपल्या वृद्ध आईला मुलींबाबत प्रश्न विचारुन अश्रू गाळत असते. आईचे लेकीवरील अताेनात प्रेम दर्शविणारे दृष्य आयुसीयूमध्ये राेज दिसते. ते बघून महिला डाॅक्टर आणि परिचारिकांच्याही डाेळ्याच्या कडा अलगत पाणावतात.