गोंडवाना विद्यापीठात शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कीर्तन सोहळा

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
गडचिरोली, 
स्वराज्याच्या संकल्पनेला तेज देणार्‍या आणि सुशासनाचा आदर्श घालून देणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त गोंडवाना विद्यापीठाच्या नविन सभागृहात ‘Shivaji Maharaj Jayanti छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य व प्रशासकीय व्यवस्थापन कौशल्य’ या विषयावर आधारित प्रबोधनात्मक कीर्तनाचा सोहळा उत्साहात पार पडला.
 
 
shivaji
 
‘Shivaji Maharaj Jayanti  छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण तसेच छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे प्रस्तावक तसेच सिनेट सदस्य सतीश पडोळे उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी शिवरायांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, लोकाभिमुख प्रशासनशैलीचा आणि काटेकोर व्यवस्थापन कौशल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचे अनुकरण करून जीवनात शिस्त, ध्येयवादी वृत्ती आणि राष्ट्रनिष्ठा जोपासावी, असे आवाहन केले. तसेच पुढील वर्षी शिवरायांच्या जयंती दिनी सुट्टी असली तरी त्यांची जयंती अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात साजरी करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.
 
 
‘Shivaji Maharaj Jayanti  या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले नागपूर येथील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आकाश टाले यांचे ओजस्वी, अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक कीर्तन. टोले यांनी आपल्या प्रभावी वाणीच्या जोरावर आणि सुरेल खंजेरीच्या नादातून त्यांनी शिवचरित्रातील पराक्रम, संघटनशक्ती, न्यायनिष्ठा आणि स्वराज्य स्थापनेमागील व्यवस्थापनदृष्टी यांचे जिवंत चित्र उभे केले. त्यांच्या कीर्तनातून राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि चारित्र्यनिर्मितीचा संदेश प्रभावीपणे प्रकट झाला. सभागृहात उपस्थित श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. इतिहास, संस्कार आणि व्यवस्थापन यांचा सुरेल संगम घडविणारा हा सोहळा विद्यापीठाच्या सांस्कृतिक व शैक्षणिक परंपरेत मानाचा ठसा उमटवून गेला. विद्यार्थ्यांच्या मनात स्वराज्य, शौर्य आणि सुशासनाची चेतना प्रज्वलित करणारा हा प्रेरणादायी उपक्रम दीर्घकाळ स्मरणात राहील, असा विश्‍वास उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक कुलसचिव डॉ. संदेश सोनुले यांनी तर आभार अध्यासन केंद्राचे समन्व्यक विकास चित्ते यांनी मानले यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.