रक्तरंजित होळी; गोळीबारात दोघांचा मृत्यू

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
फिरोजपूर,
Two killed in shooting पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात होळीच्या दिवशी घडलेल्या हिंसक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी सायंकाळी दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात गोळीबार होऊन दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची सुरुवात मुलांमधील किरकोळ वादातून झाली असल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, होळीच्या दिवशी काही मुलांमध्ये छोटासा वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही कुटुंबांतील मोठी माणसे एकत्र आली; मात्र चर्चा करताना त्यांच्यातही वाद वाढला. काही क्षणांतच हा वाद झटापटीत बदलला आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार तसेच मारहाण झाली. या हिंसाचारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला.
 
 
shooting firozpur
 
मृतांपैकी एकाची ओळख कदमा गावातील ४५ वर्षीय खिलारा उर्फ मुन्ना अशी झाली असून दुसरा मृत तिब्बी कलान गावातील ४५ वर्षीय जाज सिंग आहे. खिलारा उर्फ मुन्ना याला दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या मृत्यूनंतर दुसऱ्या गटाकडून जाज सिंग यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
 
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन्ही गटांतील लोकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असले तरी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.