Wazzer : Deaf and Dumb Children's Home कधी कधी एखादी घटना ही केवळ बातमी राहत नाही, ती प्रेरणेचा दीप बनते. वझ्झर येथील स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृहात घडलेली ही अशीच एक आगळीवेगळी आणि नाविन्यपूर्ण घटना! जिथे मूक पालकांच्या कुशीत स्वरांचा वारसा फुलला आणि आंधळ्या बहिणीच्या गाण्याने बाळाचे बालपण रंगले! तीस वर्षांपूर्वी मुंबईहून पोलिसांनी दोन निराधार, १०० टक्के मूकबधिर बालके वैशाली आणि अनिल यांना आजीवन पुनर्वसनासाठी वझ्झर येथे सुपूर्द केले. या बालगृहाचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी त्यांना केवळ आसरा नाही, तर जगण्याचा आत्मविश्वास दिला. दहा वर्षांपूर्वी समाजाच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हनुमान व्यायाम शाळा येथे त्यांचा विवाह सोहळा पार पडला. शब्द नव्हते, पण भावनांची देवाणघेवाण होती. आवाज नव्हता, पण नात्यांचा गंध होता.
१ जानेवारी २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे वैशालीने एका निरोगी बाळाला जन्म दिला. डॉक्टरांनी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार बाळ ऐकू आणि बोलू शकते. हा क्षण त्या मूक दांपत्यासाठी ईश्वराने दिलेला स्वरांचा आशीर्वादच ठरला! आंधळी मावशी, सुरेल मायाळूपणा या कथेचा आणखी एक अनोखा पैलू म्हणजे कुमारी गांधारी. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली ही मुलगी तीस वर्षांपूर्वी पंढरपूरच्या चंद्रभागा किनारी सापडली होती. वझ्झर येथे पुनर्वसन झाल्यानंतर तिने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शासनाने तिच्या कलेची दखल घेत तिला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात म्युझिक थेरपिस्ट म्हणून नियुक्त केले.
Wazzer : Deaf and Dumb Children's Home गांधारीने संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत लता मंगेशकर पुरस्कार पटकावला आहे. तिच्या मधुर आवाजात एक वेगळीच जादू आहे, जी डोळ्यांनी दिसत नाही, पण हृदयाला स्पर्शून जाते. होळीच्या सणाच्या रंगीबेरंगी वातावरणात वैशाली आणि अनिल आपल्या बाळाला घेऊन आनंदात रंगले. त्याच वेळी गांधारीने बाळाला कुशीत घेत आंधळी मावशी गांधारी...असे गाणे गुणगुणत त्याला खेळवले. रंगांच्या उत्सवात स्वरांची उधळण झाली आणि उपस्थितांच्या मनात भावनांची होळी पेटली.