काँग्रेसच्या असंसदीय वर्तनाचा अंत कधी

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
वेध
चंद्रकांत लोहाणा
congress unparliamentary काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. त्यावेळी काही लोकांना त्याचे आश्चर्यही वाटले असेल. परंतु, नरेंद्र मोदी यांच्या त्या दूरदृष्टीचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. स्वातंत्र्यानंतर जवळपास साठ वर्षे काँग्रेस पक्षाने या देशाचे वाटोळे केले, ते आता पुरे अशी जनसामान्याचीही भावना झाली आहे. राहुल गांधी काँग्रेस पक्षाला ज्या वळणावर घेऊन गेले आहे; ते बघता त्यांची सत्तेची लालसा कोणत्या स्तरापर्यंत पोहोचली आहे, हे सहज स्पष्ट होते. सलग बारा वर्षे सत्तेपासून दूर राहिल्याने राहुल गांधी यांना नैराश्याने ग्रासले आहे. अलिकडे त्यांच्या बोलण्यामध्ये ही बाब स्पष्टपणे जाणवते. राहुल गांधी यांच्या देशविरोधी कारवाया किती खपवून घ्यायच्या याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ केंद्र सरकारवर येऊन ठेपली आहे. राहुल गांधी प्रत्येक वेळी देशाबाहेर आणि देशामध्ये या मातृभूमीचा अपमान करतात. देशाच्या पंतप्रधानांना संसदेमध्ये आणि संसदेबाहेर अपशब्द बोलतात. देशाच्या संवैधाानिक संस्थांवर आरोप केले जातात. हे असं किती दिवस चालणार आहे, असा प्रश्न जनसामान्यांनाही भेडसावत आहे. प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते, हा सृष्टी आणि नियतीचा नियम आहे.
 
 
congress unparliamentary
 
 
काँग्रेस पक्षाने सत्तेच्या गुर्मीमध्ये या मातृभूमीवर अनेक घाव केले. देशाचे तुकडे पाडले. येथील बहुसंख्य असलेल्या हिंदूंना कायम दुय्यम वागणूक दिली. लाखो काश्मिरी पंडितांना आपल्याच देशामध्ये कायमचे विस्थापित व्हावे लागले. दहशतवादाला कायमचे प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीमुळे या देशामधील एकही नागरिक स्वतःला सुरक्षित समजत नव्हता. तीच अराजकता आणि ती सत्ता राहुल गांधी या देशामध्ये पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तर करीत नाही ना असा गंभीर प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे.
 
या देशाची सत्ता उपभोगण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, त्यावर फक्त काँग्रेसचाच हक्क आहे, ही वृत्ती काँग्रेस पक्षामध्ये दिवसेंदिवस प्रकर्षाने अधिक उफाळून येताना दिसत आहे. कधी नव्हे एवढी अराजकता देशाच्या राजकारणामध्ये वाढताना दिसत आहे. 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वर्षांमध्ये आपल्या मातृभूमीच्या उत्थानाकरिता रक्ताचे पाणी करून दिवसरात्र एक केली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी जगामध्ये नवीन भारताच्या शक्तीचा परिचय झाला आहे. 2014 पूर्वी 100 कोटींचा हा देश 25 कोटींच्या टीचभर असलेल्या पाकिस्तानसमोर लोळण घेत होता. त्याच देशाला नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान समोरच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ताठ मानेने उभे करून खèया स्वाभिमानी भारताची ओळख करून दिली. नेमके राहुल गांधींना हेच नको आहे. देशामध्ये तयार होणारी नवीन देशभक्त आणि स्वाभिमानी पिढी त्यांना नको आहे. भाजपाच्या राष्ट्रवादाने काँग्रेसला सतत सत्तेबाहेर ठेवले. त्यामुळे भविष्यामध्येही भाजपाची ही राष्ट्रभक्ती आपल्या घराणेशाहीला कायमची सुरुंग लावेल, ही खरी भीती राहुल गांधी यांच्या मनामध्ये घर करून बसली आहे. भाजपाच्या या कृतीला राहुल गांधी यांनी शह देण्यासाठी बारा वर्षांमध्ये अनेक प्रयत्न केले. विदेशामध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांनाच नव्हे तर आापल्या मातृभूमीलाही अनेकदा अपमानित केले. युवकांची डोकी भडकावून, शेतकरी, आंदोलनाला खतपाणी घालून त्यांनी अनेक प्रयोग करून बघितले. देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. देशामध्ये सर्वोच्च असलेल्या पंतप्रधानांना मौत का सौदागर म्हणणारीही काँग्रेस. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाच्या एकाही पंतप्रधानाच्या वाट्याला हा भोग आला नसेल, एवढा मोदींनी पचवला आहे. कोणत्याही देशभक्ताच्या वाट्याला आली नसेल एवढी घृणा, द्वेष आणि अनेक वार त्यांनी झेलले आहेत. काय चूक असेल नरेंद्र मोदी यांची. त्यांची चूक एकच ती म्हणजे त्यांनी घेतलेले देशसेवेचे अखंड व्रत. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे पाईक असलेले नरेंद्र मोदी एखाद्या योगी पुरुषासारखे आजही आपल्या देशेसेवेमध्ये अविरत कार्यरत आहेत. त्यांनी घेतलेले शक्तिशाली भारताचे व्रत अंतिम ध्येयापर्यंत गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे काँग्रेसला खरी गरज आत्मचिंतनाची असली तरी ते नक्कीच करणार नाही. कारण काँग्रेसला या देशाशी काहीएक देणेघेणे नसून त्यांना फक्त सत्ता हवी आहे. राहुल गांधी यांचे सध्याचे संसद आणि संसदेबाहेरचे वर्तन आकलनाबाहरेचे आहे. मी म्हणेल ती पूर्व दिशा आणि कायदा. लोकशाहीला आणि देशासाठीही ही वृत्ती घातक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या अराजकतेवर तातडीने अंकुश लावण्याची गरज आहे. त्यामध्येच देश आणि सामान्यांचे हित आहे.
9881717856