रस्त्यात हाॅर्न वाजवल्याच्या वादातून तरुणाची हत्या

    दिनांक :05-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
murder रस्त्यात मधाेमध चालणाऱ्या व्यक्तीला कारचा हाॅर्न वाजवून हटकणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. जुनी कामठी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत न्यू खलाशी लाईन परिसरात घडलेल्या या खळबळजनक घटनेत आराेपीने केलेल्या मारहाणीत रवी शिवकुमार अंगुटलेवार (30) या तरुणाचा मृत्यू झाला. पाेलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आराेपीला अटक केली आहे.
 
 

murder 
 
माहितीनुसार, हाेळीच्या दिवशी दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास फिर्यादी माेहनीश सुनैन अंबटवार (25, मच्छीपूल, कामठी) हे त्यांचा मित्र रवी अंगुटलेवार याच्यासह कारने (एमएच 40 व्हीई 4642) न्यू खलाशी लाईन येथून जात हाेते. यावेळी आराेपी अक्षय धनराज गेडाम (30, न्यू खलाशी लाईन) हा एका महिलेसह रस्त्याच्या मधाेमध चालत हाेता. यावेळी माेहनीश अंबटवार याने कारचा हाॅर्न वाजवला असता, आराेपीने ‘चल निकल यहा से’ असे म्हणत वाद घातला. रवी अंगुटलेवार याने आराेपीला रस्त्याच्या मधून चालण्याबाबत विचारणा केली असता, आराेपीने शिवीगाळ सुरू केली. रवी गाडीतून खाली उतरला असता, आराेपीने त्याचा गळा पकडला आणि कडा घातलेल्या हाताने त्याच्या कपाळावर जाेरात दाेन मुक्के मारले. या मारहाणीत रवी खाली काेसळला आणि बेशुद्ध झाला. माेहनीश अंबटवार यांनी लाेकांच्या मदतीने त्याला तातडीने मेयाे रुग्णालयात नेले. मात्र, डाॅक्टरांनी रवीला मृत घाेषित केले. सुरुवातीला जुनी कामठी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली हाेती.murder मात्र, बुधवारी झालेल्या शवविच्छेदनानंतर आणि माेहनीश अंबटवार यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी हत्येचा गुन्हा नाेंदवला. आराेपी अक्षय गेडाम याच्या विरूद्घ गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.