देशाच्या सक्षमीकरणासाठी पंच-परिवर्तनाची गरज : अजय नवघरे

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
वाशीम,
ajay-navghare : पंचपरिवर्तनातील सामाजिक समरसतेसाठी जातपात भेदाभेद टाळून सर्व समाज बांधवांनी एकत्रीत येऊन सर्व सण, उत्सव साजरे करावेत, तसेच एक पाणवठा, एक स्मशानभूमी आणि सर्व हिंदू बांधवास मंदिरात अनिर्बंध प्रवेश दिला जावा. युवा भारताच्या सक्षमीकरणासाठीच पंचपरिवर्तनाची गरज असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहकार्यवाह अजय नवघरे यांनी केले. वाशीम येथील गायत्री शाखेच्या वतीने सुंदरवाटीकास्थित गायत्री भवनात विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
k
 
यावेळी प्रमुख वक्ता म्हणून अजय नवघरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संमेलन व्यासपीठावर प्रमुख वक्ता रा.स्व. संघाचे विदर्भ सहकार्यवाह अजय नवघरे, प.पू. सद्गुरु शंकरबाबा, बालयोगी गोपालनाथ महाराज यांचे आशिर्वाद लाभले. प्रमुख उपस्थितीत निरंजन प्रणव स्वरुपी संगनबसव महास्वामी विरक्त मठ संस्थान, निलंगा, कलर्स मराठी अभिनेत्री गौरी अशोक थोरात यांची विशेष उपस्थिती लाभली. संमेलनाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींनी गोमातेचे पुजन केले. त्यानंतर प्रमुख अतिथींना पाच सुवासिनींनी औक्षण करून व्यासपीठावर आमंत्रित केले. त्यानंतर दीपप्रज्वलन, भारतमाता पूजन, गणेश वंदना करण्यात आली.
 
 
 
पुढे बोलतांना नवघरे म्हणाले की, ‘पंच-परिवर्तन’ या संकल्पनेचे पाच आधारस्तंभ म्हणजे, नागरिक कर्तव्य व शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार व संकल्पना, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण. पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिक चा वापर पुर्ण पणे बंद करावा आणि स्थानिक उपकरणांचा वापर वाढवावा. कुटुंब प्रबोधन म्हणजे कुटुंबातील, परिवारातील तसेच नातेवाईक यांच्यातील परस्पर संवाद वाढला पाहिजेत त्यासाठी आठवड्यात एकदा आपल्या कुलदेवतेचा एकत्रीत पणे उपासना करावी. वर्षातून एकदा धार्मिक पर्यटन करावे. नागरिक कर्तव्य म्हणून आपण आपल्याच साठी निर्माण केलेल्या नियम, कायदे यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे, त्यामुळे समाजात वाद तंटे होणार नाहीत असे प्रतिपादन केले.
 
 
संमेलनात वाशीम येथील संत सावतामाळी आखाड्यातील बाल व बालिका यांनी शिवकालीन युद्ध कलेचे चित्ताकर्षक प्रात्यक्षिक सादर केले. आत्मसंरक्षण कलेचे सादरीकरण निखील देशमुख यांच्या विद्यार्थिनीं सादर करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तसेच स्थानिक वस्तीतील समर्थ इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून संमेलनात चैतन्य निर्माण केले.
संमेलनाचे सूत्रसंचालन रामेश्वर पवार यांनी तर आभार प्रदर्शन संयोजक शंकर मोरे यांनी केले. संमेलनाचा समारोप प.पू. परमहंस मुंगसाजी महाराज, गायत्री माता आणि भारतमातेच्या आरती व महाप्रसादाने झाला.