बारामती पोटनिवडणुकीचा बिगुल; तारखा लवकरच जाहीर होणार!

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
पुणे,
Baramati by-election महाराष्ट्रातील बारामती विधानसभा मतदारसंघासाठी लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली असून ती भरण्यासाठी निवडणूक घेणे आवश्यक ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग पुढील आठवड्यात महाराष्ट्रातील दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. या निवडणुकीची घोषणा इतर पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमासोबतच केली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
 
 

Baramati by-election 
 
माहितीनुसार बारामतीसोबतच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक होणार आहे. राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांसाठीची निवडणूक जाहीर करण्याची शक्यता मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात व्यक्त केली जात आहे. मतदान एप्रिल महिन्यात होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या आत राज्याच्या कोणत्यातरी विधिमंडळाचे सदस्य होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्या बारामती पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता जवळजवळ निश्चित मानली जात आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पार्थ पवार यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात आली आहे.
 
 
काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत बारामती पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडूनच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.राहुरी मतदारसंघाबाबतही राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तेथील भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन झाले होते. तेव्हापासून ती जागा रिक्त असून आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बारामती मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ इतर पक्ष उमेदवार देणार नाहीत, अशी अपेक्षा काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील राजकीय परंपरा आणि शिष्टाचार जपत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आशा व्यक्त केली आहे. त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.