राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘गांडीव एआय’

डॉ. दीपक शिकारपूर

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
तंत्रवेध
gandive ai भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला अधिक सक्षम, वेगवान आणि तंत्रज्ञानाधारित बनवण्यासाठी ‘नॅटग्रीड’ या राष्ट्रीय गुप्तचर जाळ्याला अधिक बळकट केले असून त्यामध्ये ‘गांडीव’ या उच्च अचूकतेच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा समावेश केला आहे. नॅटग्रीड म्हणजे देशातील विविध महत्त्वाच्या माहिती संचांना जोडणारी व्यापक विश्लेषण प्रणाली होय. आधार, पॅन, बँक खाती, मालमत्ता नोंदी, प्रवास इतिहास, दूरसंचार ग्राहक पडताळणी यासह 20 पेक्षा अधिक माहिती भांडार एकत्र आणून संशयास्पद हालचालींचे विश्लेषण करण्याचे कार्य या जाळ्यामार्फत केले जाते. आजच्या युगात युद्ध केवळ रणांगणावर लढले जात नाही, तर माहिती तंत्रज्ञान आणि सायबर अवकाशातही तितक्याच प्रबळपणे खेळले जाते. अशा बदलत्या परिस्थितीत भारताने स्वतःची संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी ‘गांडीव एआय’सारख्या प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा विकास आणि वापर करण्यास सुरुवात केली आहे. महाभारतातील अर्जुनाचे गांडीव हे धनुष्य अचूकता आणि शक्तीचे प्रतीक होते; तसेच हे एआय साधन भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक अभेद्य ढाल म्हणून काम करीत आहे.
 

गांडीव एआय 
 
‘गांडीव एआय’ हे प्रामुख्याने लष्करी आणि गुप्तचर संस्थांसाठी विकसित केलेले एक अत्यंत प्रगत माहिती विश्लेषण साधन आहे. हे साधन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या विदा (डेटा) संग्रहातून अत्यंत कमी वेळेत शत्रूच्या हालचालींचा वेध घेते. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित शिक्षण आणि विदा विश्लेषणाचे प्रगत तंत्र वापरले गेले आहे. हे केवळ एक सॉफ्टवेअर नसून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षक आहे.
 
‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेंतर्गत अशा स्वदेशी साधनांची निर्मिती होणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे आपण परकीय तंत्रज्ञानावरील अवलंबित्व कमी करू शकलो आहोत. भविष्यात हे साधन अधिक प्रगत होऊन अंतराळ सुरक्षा आणि आधुनिक युद्धाच्या सर्व आघाड्यांवर भारताचे नेतृत्व करेल. राष्ट्रीय सुरक्षा ही आता केवळ बंदुकांच्या जोरावर नाही, तर बुद्धिमत्तेच्या आणि अचूक माहितीच्या जोरावर जपली जाणार आहे. नव्या युगातील अस्त्र म्हणून भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी नक्कीच बळ देईल. गांडीव ही या जाळ्याची विचारशक्ती मानली जाते. पारंपरिक पद्धतीने वेगवेगळ्या विभागांकडील माहिती स्वतंत्र स्वरूपात साठवली जात होती. त्या माहितीमध्ये परस्परसंबंध शोधणे हे वेळखाऊ आणि कष्टसाध्य काम होते. गांडीव प्रणाली मात्र विविध स्रोतांमधील माहिती एकत्र करून त्यातील नमुने, संबंध आणि विसंगती ओळखते. त्याद्वारे एखाद्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार, प्रवासाची वारंवारता, संपर्क जाळे किंवा मालमत्तेतील बदल यांचा परस्परसंबंध तपासून संभाव्य धोक्यांचा अंदाज आधीच बांधता येतो.
 
आर्थिक गुन्हेगार सहसा अत्यंत क्लिष्ट मार्गांनी पैसे लंपास करतात. ‘गांडीव एआय’ अशा गुंतागुंतीच्या व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी हुशारीने कार्य करते. सर्वप्रथम ते संशयास्पद व्यवहारांचा शोध घेते. हे साधन बँकिंग प्रणालीतील लाखो व्यवहारांचे रिअल-टाइम (तत्काळ) विश्लेषण करते. एखाद्या खात्यातून अचानक होणारे मोठे व्यवहार किंवा अनोळखी ठिकाणांहून होणारे लॉगिन यावर हे साधन लक्ष ठेवते. एखादा व्यवहार सामान्य वर्तणुकीपेक्षा वेगळा वाटल्यास हे साधन त्वरित इशारा देते. त्यानंतर ते मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंध करते. अवैध मार्गाने कमावलेला पैसा कायदेशीर दाखविण्यासाठी गुन्हेगार पैशांचे अनेक स्तर तयार करतात. ‘गांडीव एआय’ या पैशांच्या प्रवासाचा माग काढते. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड आणि विमा फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. अनेकदा बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा हप्ते लाटणे किंवा क्रेडिट कार्डचा चुकीचा वापर करणे असे प्रकार घडतात. ‘गांडीव एआय’ अर्जदाराची पृष्ठभूमी आणि जुन्या नोंदी तपासून फसवणुकीची शक्यता वर्तवते. ते केवळ माहिती साठवत नाही तर माहिती समजूनही घेते. कार्यपद्धती विदा संकलन, जोखीम मूल्यांकन आणि अचूक अंदाज या तीन मुख्य स्तरांवर चालते. विदा संकलनामध्ये बँका, शेअर बाजार आणि डिजिटल वॉलेटमधून मिळणारी माहिती संकलित केली जाते.
पुढील प्रक्रियेमध्ये जोखीम मूल्यांकनमध्ये प्रत्येक व्यवहाराला एक धोका गुणांक दिला जातो. हा गुणांक ठरावीक मर्यादेच्या पलीकडे गेल्यास संबंधित व्यवहार रोखला जातो. अचूक अंदाजात ऐतिहासिक विदा वापरून भविष्यात कोणत्या प्रकारचे सायबर हल्ले किंवा फसवणूक होऊ शकते, याचा अंदाज आधीच वर्तविला जातो.
 
‘गांडीव एआय’मुळे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राला बरेच फायदे होतात. सविस्तर माहिती आणि त्वरित प्रतिसाद हे या प्रणालीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यामुळे यात फसवणूक झाल्यानंतर तपास करण्यापेक्षा ती घडत असतानाच रोखणे शक्य होते. ही प्रणाली वापरल्यामुळे अत्यंत कमी मनुष्यबळ लागते आणि वेळेतही मोठी बचत होते. एखादे काम करण्यासाठी हजारो कर्मचाèयांनाही काही दिवस लागू शकतात, ते काम ही एआय प्रणाली काही सेकंदात करते. या प्रणालीमुळे मोठी अचूकता साधता येते. मानवी चुकांमुळे एखादा संशयास्पद व्यवहार नजरेतून सुटू शकतो, पण एआय सूक्ष्म विसंगतीही शोधते. शिवाय आर्थिक व्यवहार सुरक्षित झाल्यामुळे सामान्य नागरिकांचा डिजिटल प्रणालीवर विश्वास वाढतो. या प्रणालीचा उपयोग देशातील 11 केंद्रीय संस्थांकडून केला जातो.
 
गांडीव प्रणाली हीच प्रक्रिया सुलभ करते. देशात डिजिटल व्यवहार आणि ऑनलाईन सेवा वाढत असताना आर्थिक व सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे. लाखो कोटी रुपयांची फसवणूक, बनावट खात्यांद्वारे निधी वळवणे, आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या आडून बेकायदेशीर हालचाली करणे अशा अनेक घटना घडत आहेत. या पृष्ठभूमीवर नॅटग्रीडसारखी एकात्मिक माहिती प्रणाली अत्यावश्यक ठरते. एखादी संशयित व्यक्ती वेगवेगळ्या नावांनी किंवा ओळखपत्रांनी व्यवहार करत असेल तर विविध माहिती भांडारांमधील तपशील जुळवून तिची खरी ओळख निश्चित करता येते. गांडीव प्रणालीचे आणखी महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माहितीतील सूक्ष्म नमुने शोधण्याची क्षमता. अनेकदा गुन्हेगार लहान-लहान व्यवहारांद्वारे मोठा गैरव्यवहार लपवतात. परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषण पद्धती अशा व्यवहारांची वारंवारता, वेळ, रक्कम आणि संबंधित व्यक्तींचे जाळे तपासून संशयास्पद व्यवहार ओळखू शकते.gandive ai यामुळे तपास यंत्रणांना अधिक नेमकेपणाने कारवाई करता येते. तथापि, अशा व्यापक माहिती संकलन प्रणालीचा विचार करताना गोपनीयता आणि नागरी स्वातंत्र्य याविषयी चर्चा होणे स्वाभाविक आहे. नागरिकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित राखणे, तिचा गैरवापर टाळणे आणि कायदेशीर चौकटीतच उपयोग करणे ही शासनाची जबाबदारी आहे. कठोर नियंत्रण व्यवस्था, अधिकृत प्रवेशाची मर्यादा आणि नोंदींची तपासणी या माध्यमातून पारदर्शकता राखणे आवश्यक ठरते. सुरक्षा आणि स्वातंत्र्य यांचा समतोल साधणे हे लोकशाही व्यवस्थेचे महत्त्वाचे तत्त्व आहे.

(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)