मध्य पूर्वेतील संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात? राजनाथ सिंह

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
कोलकत्ता,
rajnath singh मध्य पूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. परिस्थिती सध्या अत्यंत असामान्य असून ती नेमकी कोणत्या दिशेने जाईल हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोलकत्ता येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक स्तरावर अस्थिरता निर्माण होत आहे. युनाइटेड स्टेट, इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनत आहे आणि सध्या तरी कोणताही देश मागे हटण्याच्या भूमिकेत दिसत नाही.
 
जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात
 
 
राजनाथ सिंह यांनी विशेषत: होर्मुज जलडमरू (Strait of Hormuz) या सामुद्रधुनीचा उल्लेख करत इशारा दिला की या मार्गात अडथळा निर्माण झाला तर त्याचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसू शकतो. पर्शियन आखातातील हा समुद्री मार्ग जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असून येथे कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठा साखळीवर थेट परिणाम होऊ शकतो. परिणामी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि अनेक देशांची अर्थव्यवस्था मोठ्या संकटात सापडू शकते, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते, सध्याची परिस्थिती आधीच गंभीर झाली आहे आणि पुढील काळात ती आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध देश जमीन, आकाश, समुद्र आणि आता अंतराळ क्षेत्रातही एकमेकांशी स्पर्धा करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही वाढती स्पर्धा आणि संघर्षाची प्रवृत्ती जागतिक सुरक्षेसाठी चिंताजनक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
राजनाथ सिंह यांनी यावेळी आणखी एक गंभीर मुद्दा मांडला. जगभरात वाढत चाललेले असे तणाव आणि संघर्ष हळूहळू “नवीन सामान्य” बनत असल्याचे त्यांनी सांगितले.rajnath singh हीच बाब सर्वात जास्त चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद करत आंतरराष्ट्रीय स्तरावर संयम आणि संवादाची गरज अधोरेखित केली.