गोंदिया क्रीडा विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेत ‘समोसा घोटाळा’

4.5 लाखाचे समोसे खाणारे ‘ते’ प्रशिक्षणार्थी कोण?

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
गोंदिया,
Gondia sports department, जिल्ह्यातील युवक कल्याणासाठी राबविण्यात येणार्‍या नाविन्यपूर्ण योजनेत आर्थिक गैरप्रकाराचा संशय व्यक्त केला जात आहे. सन 2024-25 या वर्षात नागपूरच्या अतुल्य शिक्षा फाऊंडेशनने गोंदिया जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य जनजागृती शिबीरे व कायदेविषयक कार्यशाळा जिल्ह्यातील 60 महाविद्यालयांमध्ये घेतल्याचे दाखवत 19 हजार 743 विद्यार्थ्यांवर 45 लाख रुपयांचा खर्च केल्याचा दावा केला आहे. मात्र माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमुळे या दाव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांना वाटप केल्याचे दाखवलेले सुमारे साडेचार लाख रुपयांचे ‘समोसे’. सादर बिलानुसार भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील ओम गणेशाय नमः कॅटर्स कडून 18 हजार प्लेट समोसे, प्रति प्लेट 25 रुपये दराने विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र हे समोसे प्रत्यक्षात कोणत्या महाविद्यालयांमध्ये व किती विद्यार्थ्यांना वाटप झाले, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. अतुल्य शिक्षा फाऊंडेशनने जिल्हा क्रीडा विभागाला प्रशिक्षण घेतलेल्या महाविद्यालयांची यादी सादर केली आहे
 

 Gondia sports department, 
परंतु या Gondia sports department, यादीतील काही नामांकित महाविद्यालयांकडून माहिती घेतली असता संबंधित कार्यशाळा किंवा शिबिरे आयोजितच झाली नसल्याची बाब माहिती अधिकार अधिनियमान्वये समोर आली आहे. प्रस्तावानुसार कार्यशाळेत विद्यार्थ्यांची नोंदणी, चहा-नाश्ता, दुपारचे जेवण, विषयतज्ज्ञांची चार सत्रे, विद्यार्थ्यांचे अभिप्राय आणि प्रमाणपत्र वितरण अशी संपूर्ण प्रक्रिया अपेक्षित होती. मात्र कोणत्याही ठिकाणी असा कोणताही कार्यक्रम झाल्याचे आढळत नसल्याचे समोर आले आहे. याशिवाय, 10 वी, 12 वी व पदवीनंतर काय? या करिअर मार्गदर्शन पुस्तकाचे 16 हजार विद्यार्थ्यांना वितरण केल्याचे दाखवून 48 लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. पण याबाबतीत प्रकाशकाचे बयाण नोंदविले किंवा कसे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच प्रत्येक तालुक्यातील 200 विद्यार्थी असे एकूण 1600 विद्यार्थ्यांना दोन महिन्यांचे प्रत्येकी 2000 रुपयाचे ऑनलाईन प्रशिक्षण दिल्याचे दाखवत तब्बल 32 लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आल्याचेही कागदपत्रांमध्ये नमूद आहे. या प्रशिक्षणात सीव्ही तयार करणे आणि संभाषण कौशल्य अशा उपक्रमांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नाविन्यपूर्ण योजनेतील या कथित गैरप्रकाराबाबत वृत्तपत्रांत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. समितीने आपला अहवाल सादर केल्याची माहिती मिळत असली तरी, या संदर्भात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विस्तृत माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. शासकीय निधीतून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणार्‍या योजनेत असा कथित गैरव्यवहार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून 1.25 कोटीच्या सादर केलेल्या बनावट बिलांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.