मी मोठी चूक केली- ब्रूकची कबुली

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
मुंबई,
i-made-a-big-mistake-brookes भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ मधील उपांत्य सामना अत्यंत थरारक ठरला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत भारताने सात धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत प्रेक्षकांना अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकतेत ठेवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने वीस षटकांत सात गडी गमावून २५३ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. भारतीय संघासाठीसंजू सॅमसनयाने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद ८९ धावांची खेळी साकारली आणि संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडनेही जोरदार प्रतिकार केला, मात्र अखेरीस त्यांना वीस षटकांत सात गडी गमावून २४६ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि सामना भारताच्या बाजूने झुकला.
 
 
brook england
 
सामना संपल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक याने पराभवाबद्दल स्पष्टपणे प्रतिक्रिया देत स्वतःची चूक मान्य केली. त्याने सांगितले की सुरुवातीच्या परिस्थितीचा अंदाज बांधण्यात इंग्लंडच्या संघाकडून चूक झाली. त्यांना वाटले होते की चेंडू खेळपट्टीवर थांबेल आणि फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल, परंतु प्रत्यक्षात चेंडू फलंदाजांच्या फटक्यांवर वेगाने जात होता आणि भारतीय फलंदाजांनी त्याचा चांगला फायदा घेतला. ब्रूकने क्षेत्ररक्षणातील चुका देखील मान्य केल्या. त्याच्या मते, संजू सॅमसन याचा झेल सोडणे ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली. त्या क्षणाने सामन्याची दिशा बदलली आणि भारताला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली. त्याने सांगितले की भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध अशा चुका परवडणाऱ्या नसतात.
 
पराभव असूनही ब्रूकने इंग्लंडच्या युवा फलंदाज जेकब बेथेलयाचे मनापासून कौतुक केले. या सामन्यात बेथेलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने अवघ्या ४८ चेंडूत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर १०५ धावांची झंझावाती खेळी केली. ब्रूकने सांगितले की बेथेलने निर्भय फलंदाजी करत पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजांवर आक्रमण केले आणि आपली क्षमता जगासमोर दाखवली. इंग्लंडचा संघ अखेरपर्यंत झुंज देत राहिला, मात्र लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला.