पुणे,
impact-of-iran-war-in-maharashtra गेल्या सात दिवसांपासून इस्रायल आणि अमेरिका इराणवर हल्ले करत आहेत. या युद्धामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. सतत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरू असल्याने इराणला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आतापर्यंत या युद्धात जवळपास १००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या संघर्षाचा परिणाम जगभर दिसत असून, महाराष्ट्रावरही याचा थेट परिणाम जाणवू लागला आहे.

इराण हा जगातील प्रमुख तेल आणि गॅस उत्पादक देशांपैकी एक असून, युद्ध अधिक तीव्र झाल्यास तेल आणि गॅस पुरवठा साखळी प्रभावित होण्याची भीती आहे. याचा थेट परिणाम कच्च्या तेल आणि एलपीजीच्या किमतींवर होतो, ज्याची झळ आता भारतात, विशेषतः महाराष्ट्रात जाणवू लागली आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला आहे. पुण्यात व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बुधवारपासून (५ मार्च २०२६) थांबवण्यात आला आहे. घरगुती वापरासाठी गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएलच्या चाकण प्लांटमध्ये व्यावसायिक सिलेंडर भरण्याचे काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे. डीलर्सना सूचित करण्यात आले आहे की, पुढील आदेश येईपर्यंत व्यावसायिक सिलेंडरसाठी गाड्या पाठवू नयेत.
तेल कंपन्यांनी डीलर्सना संदेश दिला आहे की, “युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा तात्पुरता थांबवण्यात येत आहे. परिस्थिती सुधारली की त्वरित कळवले जाईल.”
व्यावसायिक गॅस सिलेंडर मुख्यतः हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे, धाबे, केटरिंग सर्व्हिसेस, बेकरी, मिठाई दुकाने, हॉस्पिटल्स, ऑफिस कँटीन, सेरॅमिक्स, वस्त्रोद्योग, धातू वितळवणारे कारखाने, पावडर कोटिंग युनिट्स इत्यादी ठिकाणी वापरले जातात.