२०२६-२७ अर्थसंकल्पात काय? फडणवीसांच्या घोषणा; महत्वाची माहिती एका क्लिकवर बघा

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
मुंबई, 
maharashtra-budget-2026 राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (६ मार्च) महाराष्ट्राचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. विशेष म्हणजे, अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी अजित पवारांनी केली होती; मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला.
 
maharashtra-budget-2026
 
अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे लक्ष देणारा आहे. maharashtra-budget-2026 महात्मा फुले यांच्या जन्मशताब्दी निमित्त समिती स्थापन करून विविध कार्यक्रमांसाठी निधी दिला जाईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा उभारल्या जातील. सामाजीक समरसता वर्ष साजरा केला जाईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण झाले असून, राज्यात अनेक नवीन योजना सुरु केल्या जातील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
अजित पवार यांनी ११ वेळा अर्थसंकल्प मांडला होता. त्यांच्या करडी स्वभावामुळे शिस्त राहिली होती. त्यांना श्रद्धांजली म्हणून भव्य स्मारक उभारले जाईल आणि त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, हा अर्थसंकल्प त्यांना समर्पित आहे आणि अजित पवार यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी लवकर भरून निघेल.
अर्थसंकल्पात स्वस्त आणि महाग झालेल्या वस्तूंबाबत घोषणा खालीलप्रमाणे आहेत:
स्वस्त झालेले: मधुमेहावरील उपचार, कर्करोगावरील औषधे, क्रीडा साहित्य, वैद्यकीय उपकरणे, सौर पॅनेल
महाग झालेले: दारू, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ
अर्थसंकल्पात दिलेल्या १० महत्वाच्या घोषणा:
१. हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे लक्ष देणारा आहे. महात्मा फुले यांच्या जन्मशताब्दी निमित्त समिती स्थापन केली जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित केला जाईल. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगडमध्ये पायाभूत सुविधा उभारल्या जातील. ग्रामसमृद्धी अभियान राबवले जाईल.
२. अजित पवार यांचे स्मारक उभारले जाईल आणि त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल. हा अर्थसंकल्प त्यांना समर्पित आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
३. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर झाला. याअंतर्गत ३० हजार गावे जोडली जातील. २४५० किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून २३ हजार पूल बांधण्याचे काम सुरू आहे. मुंबई-पुणे जलदगती रेल्वीसाठी तरतूद करण्यात आली आहे.
४. गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा सहभाग सुनिश्चित केला जाईल. पाणंद रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे. ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान आणि बाजारभावाची माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवले जाईल. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी ३१ लाख शेतकरी आयडी फेब्रुवारीपर्यंत नोंदणीकृत होतील. आगामी दोन वर्षांत नैसर्गिक शेती अभियान सुरु होणार आहे.
५. राज्याचे नवीन गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म व लघू उद्योग केंद्र स्थापन केले जातील. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रूफटॉप सोलर बसवले जातील. बांबू विकास प्रकल्प वाढवले जातील. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल राहील. मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. गडचिरोली नव्या स्टील हबसाठी उदयास येईल.
६. मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नॉलॉजी सुरु होणार. पुणे गेमिंगसाठी देशातील सर्वाधिक पसंतीचे शहर बनेल. महाराष्ट्रात २९५ पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ उभारले जातील.
७. सातारा जिल्ह्यात वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोपवे प्रकल्प उभारला जाईल. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी स्थापन केली जाईल.
८. मुंबईत आणखी भुयारी मेट्रो करणार, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात १ हजार २०० किलोमीटर मेट्रो मार्ग उभारले जातील. ६ हजार किलोमीटर द्रुतगती मार्ग विकसित केले जातील. २०२९ पर्यंत १६५ किलोमीटर मेट्रो मार्गिका तयार होतील. दक्षिण मुंबईला २०२८ पर्यंत समृद्धी महामार्गासह जोडले जाईल. वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण होईल. पनवेल ते कर्जत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल.
९. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ मिळेल.
१०. मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजना पुढेही सुरु राहणार असून त्यासाठी आवश्यक भरीव तरतूद करण्यात आली आहे.