Maharashtra Budget 2026 Live...वाचा एका क्लिकवर...दादांचे भव्य स्मारक उभारणार

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Maharashtra Budget 2026 Live राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून ६ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलाच आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष मुख्यमंत्री फडणवीसांच्या घोषणांकडे लागले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात एकूण दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यातील काही महत्वाच्या घोषणा पुढीलप्रमाणे आहेत....
 
 
 
Maharashtra Budget 2026 Live
 
 

शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी

राज्यात शहरी विकासावर भर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.
 
शहरी सेवा डिजीटल करण्याचे पाऊल

शहरी विकासाच्या क्षेत्रात राज्यातील ७० टक्के लोकसंख्या शहरी भागात राहणार असल्यामुळे, शहरी सेवा डिजीटल करण्याचे पाऊल उचलले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प तीन स्थानकांसह २०२७ पर्यंत पूर्ण होईल. तसेच, उरण परिसरात तिसरी मुंबई विकसित होणार असून, रायगड, पेण आणि नवी मुंबई विमानतळ ग्रीन फिल्ड प्रकल्पांतर्गत उभारले जातील. मुंबईत बेकायदेशीर बांधकाम होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. चौथी मुंबई वाढवण्याच्या कामांची सुरुवात केली जाईल आणि मुंबई-महानगर रेल्वे क्षेत्रात १० लाख नवी घरे उभारली जातील, तसेच अनधिकृत बांधकामे होणार नाहीत यासाठी रोडमॅप तयार केला जाईल.

 
 
 
  • हा अर्थसंकल्प २०४७ च्या विकासाकडे लक्ष ठेवतो. महात्मा फुले यांचा जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल आणि विविध कार्यक्रमांसाठी निधी दिला जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्राचा सर्किट विकसित केला जाणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यात पायाभूत सुविधा उभारल्या जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झाले असून, ग्रामसमृद्धी अभियान राबवले जाणार आहे.
  • उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ११ वेळा अर्थसंकल्प मांडला आणि त्यांच्या कटाक्षी स्वभावामुळे शिस्त कायम राहिली. त्यांना श्रद्धांजली म्हणून अजित दादांच्या नावावर भव्य स्मारक उभारले जाईल. तसेच त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरू केला जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाला अजित दादांना समर्पित केल्याची घोषणा केली.
  • देहूमध्ये विकास आराखडा सादर केला जाणार आहे.
  • महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे राज्यातील शेतकरी व कृषी क्षेत्रास मोठा पाठबळ मिळेल.
पायाभूत सुविधा
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून, याअंतर्गत सुमारे ३० हजार गावे जोडली गेली आहेत. २४५० किमी रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत आणि २३ हजार पूलांच्या बांधकामासाठी काम हाती घेतले आहे. मुंबई-पुणे जलदगती रेल्वीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
शेती
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. पाणंद रस्त्यांना मान्यता देण्यात आली असून ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान आणि बाजारभावाची माहिती दिली जात आहे. चारही कृषी विद्यापीठात सहाय्यक उपाययोजना राबवल्या जात आहेत, ज्यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत होईल. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत असून, फेब्रुवारी पर्यंत १ कोटी ३१ लाख शेतकरी आयडी तयार झाले आहेत. आगामी चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा मजबूत करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान सुरू होणार असून, गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा समावेश केला जाणार आहे. महिला गोपालक आणि शेळीपालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत.
उद्योग
राज्यातील नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले असून प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म व लघु उद्योग केंद्र स्थापन केले जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्र उभारून ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री सौर योजनेअंतर्गत रुफ-टॉप सोलर प्रकल्प सुरू होतील, तसेच बांबू विकास प्रकल्प वाढविण्यात येणार आहेत. मुंबई आणि पुण्यात ५० अब्ज डॉलरचे केंद्र तयार करण्याचे उद्दिष्ट असून, गडचिरोलीत नवे स्टील हब उभारले जाईल ज्यामुळे २ लाख कोटींची गुंतवणूक आणि ७० हजार रोजगार निर्माण होईल.
क्रिएटिव्ह उद्योग
मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू होणार आहे. पुणे देशात जीसीसीसाठी सर्वाधिक पसंतीचे शहर ठरेल. महाराष्ट्रात २९५ पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करून जगात गेमिंग क्षेत्रात आघाडी मिळविण्याचे उद्दिष्ट आहे.
पर्यटन
सातारा जिल्ह्यात वासोटा किल्ल्यासाठी रोप-वे प्रकल्प उभारले जातील. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी निर्माण केली जाईल. १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाच ठिकाणी पर्यटन विकासाला प्राधान्य दिले जाईल.
शहरी विकास
राज्यात शहरी लोकसंख्या ७० टक्क्यांपर्यंत पोहोचणार असल्याने शहरी सेवा डिजीटल केल्या जातील. मुंबई-पुणे बुलेट ट्रेनचे तीन स्थानक २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. उरण परिसरात तिसरी मुंबई म्हणून विकास योजना राबवली जाईल. बेकायदेशीर बांधकाम टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. चौथी मुंबई एमएमआरमध्ये उभारून १० लाख नवीन घरे तयार केली जातील आणि नव्या अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवले जाईल.