अर्थसंकल्पीय प्रतिक्रीया...

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
वर्धा,
maharashtra-budget-response : आज मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर वर्धा जिल्ह्यातील मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया...
 
 
maharashtra-budget
 
 
 
दिलेला शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी पाळला : पालकमंत्री भोयर
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला गतीमान करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या हिताचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे राज्य अजून गतिमान होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचे मोठी घोषणा सरकारने केली आहे. यामुळे राज्यातील शेतकर्‍यांना आधार मिळणार आहे. दिलेला शब्द पाळणारे मुख्यमंत्री राज्याला लाभले आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री तथा राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली. विदर्भात हरितक्रांती आणणारा वैनगंगा—नळगंगा प्रकल्पासह राज्यातील अन्य नदी जोड प्रकल्पांना मंजुरी देण्यासोबतच आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेटर जमीन सिंचनाखाली येणार आहे. अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी घोषणा केली आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा व संशोधनवृत्ती वाढावी यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असेही ना. डॉ. भोयर यांनी दिली.
................
विकसित महाराष्ट्राचा भक्कम पाया : तडस
अर्थसंकल्पातून राज्याला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा स्पष्ट रोडमॅप मांडण्यात आला आहे. ’सर्वसमावेशक विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान’ हे या बजेटचे मुख्य सूत्र असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार रामदास तडस यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, मोफत वीज योजना, लाडकी बहीण योजनेचा विस्तार, कृषी तंत्रज्ञान, चौथी मुंबई आणि पायाभूत सुविधा, युवा आणि स्टार्टअप्स, पर्यावरणपूरक बांबू मिशन, या सर्व घोषणा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार असल्याचे माजी खासदार तडस म्हणाले. सर्वच क्षेत्रात विकासाची झेप घेणारा, सबल, सक्षम आणि आत्मनिर्भर महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प आहे.
...................
आकड्यांचा फुगा; जनतेच्या तोंडाला पाने पुसली : खा. काळे
अर्थसंकल्प हा विकासाचा आराखडा नसून आकड्यांचा फुगा असल्याचा आरोप खा. अमर काळे यांनी केला. हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असून केवळ घोषणांचा बाजार मांडून सरकारने सर्वसामान्यांची दिशाभूल केल्याची टीका त्यांनी केली.
................
विकासाच्या उंच शिखरावर नेणारा अर्थसंकल्प : आ. कुणावार
अर्थसंकल्प सर्वसमावेशक असुन महाराष्ट्राला विकासाच्या उंच शिखरावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी, बेरोजगार, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी एक परर्वणी ठरणारा असल्याची प्रतिक्रिया आ. समीर कुणावार यांनी दिली.
.................
राज्याच्या प्रगतीचा नवा अध्याय : आ. वानखेडे
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, कष्टकरी आणि महिलांच्या सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय आहे. २०४७ चा विकसित महाराष्ट्र डोळ्यापुढे ठेवून सूत्रबद्ध पद्धतीने मांडलेला अभ्यासपूर्ण अर्थसंकल्प आहे. प्रत्येक विषयाचे नियोजनपूर्वक विचार करून ‡ शेती, उद्योग, कृषीउद्योग, सामाजिक न्याय तसेच पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांमध्ये पुढील वाटचालीचा स्पष्ट विचार या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. विशेषतः वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा प्रकल्पाला मिळालेल्या प्रशासकीय मान्यतेमुळे आर्वी तालुयातील काही गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून, १० ते १५ ठिकाणी शेतीमाल मूल्य साखळी तयार केल्याने शेतकर्‍यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल, अशी प्रतिक्रिया आ. सुमित वानखेडे यांनी दिली.
................
ग्रामीण विकास, रोजगाराला चालना देणारा : आ. बकाने
अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्‍यांसाठी वसुधा व्हॉइस सेवा तसेच गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यामुळे शेतकर्‍यांना मोठा आधार मिळणार असल्याची प्रतिक्रिया आ. राजेश बकाने यांनी दिली. बळीराजा शेत पांधन योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, तसेच १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. याशिवाय घरकुल योजना, मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन, लघुउद्योगांसाठी आयुक्तालय, बचत गटांच्या मॉल उभारणी, कौशल्य विकासावर भर आणि पर्यटनासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी दिलासा देणारा ठरला असल्याचे आ. बकाने यांनी सांगितले.
..................
अर्थसंकल्पात शैक्षणिक प्रगतीला ब्रेक : आ. अडबाले
अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या असल्या तरी शिक्षण क्षेत्राकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेषतः मराठी माध्यमाच्या शाळांचा विकास, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण प्रणालीशी सुसंगत सुविधा देण्याबाबत या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली दिसत नाही, अशी प्रतिक्रिया आ. अडबाले यांनी दिली.
...................
अजित पवार यांना आदरांजील वाहणारा अर्थसंकल्प : अ‍ॅड. कोठारी
राज्यातील नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देऊन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एकप्रकारे सरकारने आदरांजली दिली आहे अशी प्रतिक्रिया हिंगणघाट कृउबाचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी दिली. शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेत त्यांना अधिक दिलासा देण्याचा सरकारचा हा निर्णय अत्यंत संवेदनशील आणि दूरदृष्टीपूर्ण आहे. राज्यात सर्वात जास्त प्रोजेट सुरू करण्यात येणार असल्यामुळे बेरोजगार युवकांना दिलासा मिळेल असेही अ‍ॅड. कोठारी म्हणाले.
.............
विदर्भालाही भरीव तरतूद : गाते
अर्थसंकल्पात शेतकर्‍यांकरिता भरीव तरतूद करण्यात आल्याने हा अर्थसंकल्प शेतकरी हिताचा अर्थसंकल्प ठरला असून बळीराजाला खुश करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संजय गाते यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. गडचिरोली स्टीलहब, चित्रनगरी रामटेकला, नागपुरात महाराष्ट्र आरोग्य संस्था स्थापना, बल्लारपूरला टिंबर म्युझियम उभारणार या विदर्भाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
.................
महिलांना न्याय देणारा अर्थसंकल्प : नप अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर
राज्याचा अर्थसंकल्प हा सामाजिक भान जोपासून महिलांना न्याय देणारा आहे. यासोबचत कर्ज माफी करण्याच्या निर्णयाने शेतकर्‍यांना आथिक पाठबळ मिळेल, अशी प्रतिक्रिया नप अध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी दिली. महिला सक्षमीकरण, युवकांसाठी उद्योग क्षेत्रात केलेल्या तरतुदीमुळे बेरोजगारी दूर होणार आहे. शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद ही नव्या महाराष्ट्राची जडणंघडणं करणारी असल्याचे डॉ. नयना तुळसकर म्हणाल्या.
.................
ध्येयाकडे वाटचाल दर्शवते : पं. अग्निहोत्री
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्र २०४७ उद्दिष्टावर आधारित आहे. बजेटमध्ये शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा आहेत तर वित्तीय शिस्त आणि विकासावर भर देण्यात आला आहे. शेतकर्‍यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ (सप्टेंबर २०२५ पर्यंतचे थकबाकी), ७५ गावांमध्ये एआयद्वारे पायलट प्रकल्प, नैसर्गिक शेती मोहीम, बुलेट ट्रेनसाठी तरतूद केली असल्याने हे बजेट राज्याच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या ध्येयाकडे वाटचाल दर्शवते, अशी प्रतिक्रिया जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी दिली.
..................
विकासाभिमूख अर्थसंकल्प : सीए देशपांडे
अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना भरघोस मदत योजना जाहीर झाली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित असलेले कृषी कर्ज माफ, नियमित कृषी कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर रुपये ५० हजार पर्यंतची मदत, शेतकर्‍यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा, देणे या आजच्या अर्थ संकल्पातील लक्ष्य वेधी तरतुदी आहेत. आजच्या अर्थसंकल्पाद्वारे राज्याची अर्थ व्यवस्था ही संपूर्ण जगातील ३० व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरू शकेल, असा विश्वास येथील प्रसिद्ध सनदी लेखापाल व्ही. बी. देशपांडे यांनी दिली. भांडवली गुंतवणुकी मध्ये २१ टयांच्या अपेक्षीतवाढी मुळे उद्योगधंद्याची भरभराट होणार आहे. २३ हजार किमीच्या नवीन रस्ता योजनेमुळे विकासात भर पडणार असल्याची प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली.
....................
अत्यंत निराशाजनक : डॉ. मेघे
अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासापेक्षा शहरी मतदारांना खुश करण्यावर अधिक भर दिलेला दिसतो. मेट्रोसारख्या प्रकल्पांवर आणि मोठ्या कॉन्ट्रॅटरांवर जास्त लक्ष देण्यात आले आहे तर शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले दिसत असल्याची प्रतिक्रिया येथील महाराष्ट प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. अभ्युदय मेघे यांनी दिली. शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली तरी ती सरळ आणि स्पष्ट न करता अनेक अटी व जाचक नियम घालून करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात अनेक शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळणे कठीण होणार आहे. निराशाजनक असल्याचे मत डॉ. मेघे यांनी व्यक्त केले आहे.
.....................
अर्थसंकल्पात आकड्यांच्या खेळ : कांबळे
अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा आहेत. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे. राज्यातील सर्वसामान्यसह शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी काहीच नाही. हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजया लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री तथा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष रणजित कांबळे यांनी दिली.
.................
फत आश्वासनांची फुलबाजी : वांदिले
नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी ही मागणी होती. परंतु, सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पान पुसली अशी टीका शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले केली. शेतकरी, महिलां व बेरोजगार युवकांसाठी निराशाजनक असून केवळ केवळ आश्वासनाच्या फुलबाजी झाल्याचे अतुल वांदिले म्हणाले.
...................
महायुती सरकारचा मोठा दिलासा : विजयकर
राज्यातील महायुती सरकार जनतेचे सर्वकष हित साधणारे असून आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी देणार असल्याचे जाहीर केल्याने चिंतातूर शेतकर्‍यांना महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सर्व समाज घटकाचा विचार करून राज्यातील जनतेला समृद्धीकडे नेणारा आणि राज्याला प्रगतीपथावर नेणारा असा असल्याची प्रतिक्रिया लीड कॉमचे माजी अध्यक्ष अशोक विजयकर यांनी दिली.
..................
ठोस काहीच नसलेला अर्थसंकल्प : पांगुळ
अर्थसंकल्पात महागाई कमी करण्याकरिता काही ठोस निर्णय नाही तर शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली. परंतु, ती देताना केव्हा मिळेल त्याचे नियम काय यात कुठलीही स्पष्टता नाही. रोजगार निर्मितीकडे विशेष लक्ष देण्यात आले नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोठ्या आणि मोजया शहरांचा विचार करून तयार करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया वर्धेचे नगराध्यक्ष सुधीर पांगूळ यांनी दिली.
................
कर्जात महाराष्ट्र माझा : हिवरे
राज्यावर ९ लाख ९३ हजार कोटींचे कर्ज आहे. गुजरात, कर्नाटकाच्या तुलनेत राज्याचा विकास नाही. गत अर्थसंकल्पात दिलेली आकडेवारीची पूर्तता झाली नाही. रोजगार निर्मितीवर या अर्थसंकल्पात भर नाही. उद्योग निर्मितीत महत्त्वाच्या असलेल्या लघुउद्योगाला चालना नाही. ठेकेदारांच्या प्रलंबित देयकावर कुठलाही निर्णय नाही. ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हा विकासाचा नाही तर भकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया
जिल्हा इंडस्ट्रीयालिस्ट असोसिएशनच अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी दिली.
................
अटी शर्थीची किनार : शेंडे
राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेकरिता ठोस असा काहीच निर्णय घेतलेला नाही. सर्वच निर्णयात अटी शर्थीची किनार असल्याचे पुढे येत आहे. शेतकरी कर्जमाफीतही तोच प्रकार आहे. मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा एकही निर्णय नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात सहकारी सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. त्यांचे पुनरुज्जीवण होणे गरजेचे होते. त्याबाबत निर्णय घेतला असता तर २५ हजार युवकांना रोजगार मिळाले असते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी दिली.
...............
विकासाला चालणा देणारा अर्थसंकल्प : बजाज
या अर्थसंकल्पात शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाचा प्रश्न सोडविण्यावर चर्चा झाली. शेतकर्‍यांसाठी करण्यात आलेली कर्जमाफी महत्त्वाची ठरली. गडचिरोली जिल्ह्यात विमानतळासाठी जमीन अधिग्रहीत करण्यात येणार असल्याने विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा लाभ वर्ध्यातील शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प रोजगारासह विकासाला चालणा देणारा असल्याची प्रतिक्रिया समाजसेवक व युवा उद्योजक
प्रदीप बजाज यांनी दिली.
.............
घोषणांची भरमार : अ‍ॅड. टोकस
अर्थसंकल्पात रोजगार संदर्भात कुठलाही खास निर्णय घेण्यात आला नाही. तर शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली. पण ती केव्हा देणार या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. केवळ घोषणा करायची आणि अटीशर्थीत त्यांना फिरवायचे हा प्रकार या सरकारकडून नेहमीच झाला आहे. एकंदरीत नुसती घोषणांची भरमार या अर्थसंल्पात असल्याचे दिसून आले असल्याची प्रतिक्रिया अ. भा. काँग्रेस कमिटीच्या सदस्य चारुलता टोकस यांनी दिली.
....................