शरद पवार संपले नाहीत

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
मोरेश्वर बडगे
sharad pawar तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा किंवा त्यांचा द्वेष करा, त्यांच्या नेटवर्किंगच्या कौशल्याबद्दल अचंबित व्हा किंवा ते कोणतीही गोष्ट मॅनेज करू शकतात म्हणून त्यांना मोडीत काढायचा प्रयत्न करा, पण देशाच्या राजकारणातून तुम्ही त्यांना बाजूला ठेवू शकत नाही. ही व्यक्ती म्हणजे शरद पवार. घटक पक्षांचा कडाडून विरोध असतानाही म्हातारपणी राज्यसभेची उमेदवारी खेचून शरद पवारांनी आपला दम दाखवून दिला. पवारांना उमेदवारी दिली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेम करतील आणि त्यात महाविकास आघाडीची मतं फुटतील या भयापोटी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस शरण गेली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट तर शरद पवार यांच्या भोवतीच गेली सहा दशके फिरत आहे. आणखी सहा वर्षे फिरणार. वयाच्या 85 व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाचा हा वयोवृद्ध नेता तिसऱ्यांदा बिनविरोध राज्यसभेवर जायला सज्ज झाला आहे. 1967 मध्ये शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले.
 
 

शरद पवार  
 
तेव्हापासून सुरू त्यांची संसदीय कारकीर्द अखंड सुरू आहे. सहा वेळा विधानसभा, एक वेळा विधान परिषद, पुढे सात वेळा लोकसभा आणि आता तिसऱ्यांदा राज्यसभा. महाराष्ट्रात असताना शरद पवारांना स्वबळावर कधीही सरकार बनवता आले नाही. जोडतोड टेक्नॉलॉजीच ते चालवत आले. आताही ज्या महाविकास आघाडीने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, त्या आघाडीमध्ये त्यांचे फक्त 10 आमदार आहेत. अनेक जण त्यांच्या राजकारणाचे मूल्यमापन आकड्यांवर करण्याची गल्लत करतात. त्यांना पवार कळलेच नाहीत, असेच म्हणावे लागेल. हा माणूस काहीही करू शकतो या गोष्टीला राज्यसभेच्या त्यांच्या उमेदवारीने बळ मिळाले आहे. जेव्हा जेव्हा पवार संपले अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तेव्हा पवार नव्या जोमाने उभारी घेताना दिसतात. आज तेच घडतंय का?
 
राज्यसभेच्या सात जागांसाठी महाराष्ट्रात 16 मार्च रोजी निवडणूक लागली आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 5 मार्च अखेरची मुदत होती. सात जागांपैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येणार आहे. तीही महाविकास आघाडी एकसंध राहिली तर! दोन दिवस आधीपर्यंत रणकंदन माजले होते. आदित्य ठाकरे यांनी या जागेवर दावा सांगितला होता. ‘ही आमची हक्काची जागा आहे. संख्याबळ आणि रोटेशनही पाहिले तर आम्हालाच ही जागा मिळायला पाहिजे’ असा दावा उबाठाचे सुप्रीमो उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे सुरुवातीपासून करीत होते. काँग्रेसचा आग्रह वेगळा होता. राज्यसभेतले विरोधी पक्षनेतेपद टिकविण्यासाठी काँग्रेसला ही जागा पाहिजे होती. आमचा पक्ष राष्ट्रीय आहे, असे विजय वडेट्टीवार सांगायचे. राज्यसभेत विरोधी पक्षनेत्याच्या पदावर दावा करायचा तर किमान 25 खासदार हवेत. सध्या राज्यसभेत काँग्रेसचे 27 खासदार आहेत. यात काही जण निवृत्तही होत आहेत. सध्याचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यांची मुदत जूनमध्ये संपते. काँग्रेसला ते टेन्शन होते. राज्यसभेच्या बदल्यात विधान परिषद घ्या, अशी ऑफर काँग्रेसने उद्धव ठाकरेंना दिली होती. महाविकास आघाडीकडे एकूण 46 मतं होती आणि जिंकण्यासाठी 37 मतांचा कोटा होता. एकच उमेदवार निवडून येऊ शकत होता. त्यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत हवे होते. तेच होत नव्हते.
 
उबाठा आणि काँग्रेस, दोघेही दोन दिवस आधीपर्यंत जागा सोडायला तयार नव्हते. दोन राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले तर शरद पवार एनडीएसोबत जातील, याची त्यांना भीती होती. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे ‘अ‍ॅक्शन मोड’वर आल्या आणि पाहता पाहता चित्र बदलले. त्यांनी आधी दिल्लीत राहुल गांधी यांच्याकडे फिल्डिंग लावली. नंतर उद्धव ठाकरे यांना त्यांच्या ‘मातोश्री’वर भेटल्या. पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, याची हमी दिली. ‘विलीनीकरणाचा प्रश्नच आता उद्भवत नाही’ असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर केले तेव्हा उद्धव ठाकरे आणि दिल्लीतले काँग्रेस हायकमांड राजी झाले. शरद पवार उमेदवार नसतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेम करू शकतात ही भीतीही होतीच. त्यामुळे 24 तासात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने निर्णय फिरवला. तलवारी म्यान झाल्या. पण काय वेळ आली पहा शरद पवारांवर. नियतीचा खेळ पहा. या पवारांनी अनेकांना आमदार केले. अनेकांना खासदार केले. आज त्यांनाच एका खासदारकीसाठी एवढे अगतिक होण्याची वेळ आली. ‘कुणी राज्यसभा देता का राज्यसभा?’ असे ओरडून मागण्याची वेळ त्यांच्यावर का आली? शरद पवारांना या वयात राज्यसभेवर कशाकरिता जायचे आहे? शरीर थकले असले तरी म्हाताèया पवारांचा मेंदू ठणठणीत आहे. खासदारकी खिशात नसेल तर कोणी विचारणार नाही, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. आता राज्यसभेवर आले तर पक्षाच्या संसदीय पक्षाचे ते नेते असतील. त्यांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आहेत. हे खासदार कधीही भाजपमध्ये पळतील याचे टेन्शन असणारच.
 
अजितदादांच्या मृत्यूनंतर राजकारण खूप बदलले आहे. शरद पवारांना दोन राष्ट्रवादीचे विलीनीकरण हवे होते. त्या आडून त्यांना दोन्ही राष्ट्रवादीचा ताबा हवा होता. दादा अचानक गेल्याने सारे फिस्कटले. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी चौथ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपल्याला सासऱ्याच्या सापळ्यात अडकायचे नाही, हे दाखवून दिले. सुनेत्रा यांचा मुलगा पार्थ याला शरद पवारांनी कधीही ताकद दिली नव्हती. त्यामुळे आता पार्थ शरद पवारांच्या नादी लागायचा प्रश्न नाही. पवारांपुढे अनेक प्रश्न आहेत. धड उठता येत नाही, ते काय बोलले ते समोरच्याला कळत नाही. कितीही म्हटले तरी ते शरीर आहे. थकणार. या महिन्यात शरद पवार दोनदा रुग्णालयात भरती झाले होते. नातवंडांना खेळवण्याचेही त्यांचे वय संपले आहे. ‘बोलतात त्याच्या नेमके उलटे वागतात’ अशी पवारांची कीर्ती आहे. ‘आता निवडणूक लढवणार नाही’ असे त्यांनी नातू युगेन्द्रच्या प्रचारात जाहीर सभेत सांगितले होते. तरीही सत्तेचा मोह संपत नाही.
 
काही का असेना, पवारांच्या उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होते आहे. भाजपाने चार जागांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते आणि मराठवाड्यातले माजी आमदार रामराव वडकुते यांना संधी दिली. देताना पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. दलित-आदिवासी, मराठा-ओबीसी हा जातीच्या समीकरणांचा तसेच प्रादेशिकतेचाही समतोल साधला आहे. वडकुते आणि इवनाते ही दोन्ही नावे अनपेक्षित होती. इवनाते या आदिवासी नेत्या आहेत. नागपूरच्या महापौर राहिल्या आहेत. वडकुते हे हिंगोलीचे धनगर समाजातले आहेत. पक्षाने तब्बल 28 नावं हायकमांडकडे पाठविली होती. त्यातून हे माणिकमोती हाती लागले आहेत. नगरसेवक ते खासदार हा प्रवास भाजपामध्येच होऊ शकतो याची पुन्हा एकदा प्रचीती आली. आपण राष्ट्रपती होऊ हे द्रौपदी मुर्मू यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते.sharad pawar भाजपा तळागाळातल्या कार्यकर्त्यांना उचलतो हा संदेश पुन्हा एकदा देशभर गेला आहे. 2019 मध्ये तिकीट नाकारल्यानंतर तावडे हे राज्यातून फेकले गेल्यासारखे होते. तरीही हिंमत न हारता या मराठा नेत्याने दिल्लीची वाट धरली. पक्ष संघटनेत काम सुरू ठेवले. फिनिक्स पक्ष्यासारखी त्यांची भरारी आहे. ज्याचे तिकीट कापले तो आता तिकिटं वाटू लागला. 5-6 वर्षे तोंडावर बोट ठेवून पक्षासाठी मेहनत घेतल्याचे फळ त्यांना उमेदवारीच्या रूपात मिळाले. दलित चळवळीतला यशस्वी नेता म्हणून रामदास आठवले यांच्याकडे पाहिले पाहिजे. एकूणच या यादीने बिनविरोध निवडणुकीचा मार्ग प्रशस्त केला, असेच म्हणावे लागेल.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)