स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या

*आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

    दिनांक :06-Mar-2026
Total Views |
चंद्रपूर, 
sudhir-mungantiwar : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, दूरदृष्टीचे विचारवंत आणि प्रभावी साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ या उपाधीने मरणोत्तर गौरविण्यात यावे, अशी मागणी अशासकीय ठरावात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. महाराष्ट्र शासनाने तसा शासकीय ठराव केंद्र शासनाकडे पाठवावा, अशीही विनंती त्यांनी केली.
 
 

jkl 
 
 
 
ते म्हणाले की, सावरकरांचे संपूर्ण आयुष्य हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रभक्तीच्या जागृतीसाठी आणि राष्ट्रीय विचारांच्या प्रसारासाठी समर्पित होते. इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र क्रांतीची प्रेरणा देणार्‍या अग्रगण्य क्रांतिकारकांमध्ये त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. तरुण पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची जाज्वल्य भावना निर्माण करणारे त्यांचे लेखन, भाषण आणि कार्य आजही प्रेरणादायी आहे.
 
 
 
स्वातंत्र्यवीरांनी परदेशात असताना ‘अभिनव भारत’ सारख्या संघटनांद्वारे स्वातंत्र्यलढ्याला वैचारिक व संघटनात्मक बळ दिले. लंडनमध्ये असताना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध क्रांतिकारी विचारांची बीजे पेरली. त्यानंतर त्यांना झालेली अटक, त्यानंतरचा ऐतिहासिक मार्सेल्स प्रसंग आणि अखेरीस अंदमानच्या सेल्युलर कारागृहात भोगलेली अमानुष शिक्षा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायी आणि प्रेरणादायी अध्याय आहे.
 
 
अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांनी वर्षानुवर्षे अमानुष यातना सहन केल्या. कैद्यांना तेलाच्या घाण्याला बैलांप्रमाणे जुंपणे, कष्टप्रद कामे, कठोर शिक्षा आणि एकाकी कारावास अशा असंख्य यातनांनाही त्यांनी धैर्याने तोंड दिले. त्या काळातही त्यांनी आपले राष्ट्रवादी विचार जिवंत ठेवले. कारागृहातील भिंतींवर कविता कोरणे, सहकार्‍यांना प्रेरित करणे आणि स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी मनोबल उंच ठेवणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते, असे त्यांनी सांगितले.
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर ते एक प्रतिभावान साहित्यिक, इतिहासकार, कवी, नाटककार आणि समाजसुधारकही होते. त्यांच्या लेखनातून राष्ट्रभक्ती, विज्ञाननिष्ठता, सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचा प्रभावी संदेश दिसून येतो. अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक समता आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देणारा त्यांचा विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहे. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सावरकरांनी मोठे योगदान दिले, असे मुनगंटीवार म्हणाले.
 
ठराव पारित करून केंद्राकडे पाठवणार : रावल
 
 
राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याबाबतचा शासकीय ठराव राज्य शासनाच्या वतीने मांडण्यात येईल आणि तो केंद्र शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.