मुंबई
Heartbeats The Music Within concert, भारतीय संगीतविश्वातील दिग्गज तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त ग्रेस फाउंडेशनतर्फे ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ या वैशिष्ट्यपूर्ण संगीत कार्यक्रमाचे भव्य पुनरागमन होत आहे. ९ मार्च २०२६ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे हा विशेष कार्यक्रम रंगणार असून संगीतप्रेमींना एक अनोखा संगीत अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ ही संकल्पना संगीतकार आणि सांस्कृतिक विचारवंत शशी व्यास यांनी २००८ साली मांडली होती. या संकल्पनेमागील विचार असा की, प्रत्येक मानवाने आयुष्यात सर्वप्रथम ऐकलेला नाद म्हणजे आईच्या उदरातील हृदयाची धडधड. या आदिम नादाशी संगीताचा खोल संबंध जोडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जातो. या कल्पनेतील कलात्मक सामर्थ्य ओळखून उस्ताद झाकीर हुसेन यांनी त्यावेळी या कार्यक्रमात सहर्ष सहभाग नोंदवला होता.ग्रेस – (गुणीजान रिसर्च, आर्ट, कल्चर अँड एज्युकेशन) फाउंडेशनच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. ताल आणि सुरांच्या अद्भुत संगमातून मानवी हृदयाच्या ठोक्याशी नातं सांगणारा हा कार्यक्रम रंगमंचावर एक वेगळाच अनुभव देतो. संथ भक्तिगीतांमधून मनाला शांतता लाभते, तर दमदार तालांच्या लयी प्रेक्षकांमध्ये रोमांच निर्माण करतात.
या कार्यक्रमाच्या मूळ सादरीकरणात शंकर महादेवन, व्ही. सेल्वागणेश, यू. श्रीनिवास आणि शिवमणी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सहभाग घेतला होता. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये सादर झालेल्या या कार्यक्रमाला संगीत रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
आता तब्बल १८ Heartbeats The Music Within concert, वर्षांनंतर ‘हार्टबीट्स – द म्युझिक विदिन’ नव्या उर्जेसह आणि नव्या पिढीच्या प्रतिभावंतांसह पुन्हा रंगमंचावर येत आहे. या कार्यक्रमात भारताच्या समृद्ध संगीत परंपरेचे वारसदार असलेले अनेक युवा कलाकार सहभागी होणार आहेत. त्यामध्ये एस. आकाश (बासरी), मेहताब अली नियाझी (सितार), सिद्धार्थ बेलमन्नू (गायन), शिखरनाद कुरेशी (ड्रम्स), स्वामीनाथन सेल्वगणेश (कंजिरा), इशान घोष (तबला) आणि कौशिकी जोगळेकर (कीबोर्ड) यांचा समावेश आहे.कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शशी व्यास यांनी सांगितले की, संगीत ही हृदयाच्या ठोक्यांची भाषा आहे आणि ती शब्द समजण्यापूर्वीच माणसाशी संवाद साधते. ‘हार्टबीट्स’चे पुनरुज्जीवन म्हणजे त्या शाश्वत संवादाला जिवंत ठेवण्याचा आणि संगीताला अध्यात्मिक उंचीवर नेणाऱ्या गुरूंना वंदन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.उस्ताद झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त साकारला जाणारा हा कार्यक्रम संगीत, ताल आणि आध्यात्मिक अनुभव यांचा अनोखा संगम ठरणार असून मुंबईतील संगीतप्रेमींसाठी तो एक अविस्मरणीय पर्व ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.