कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने इराणवर भीषण हल्ले

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Attacks using artificial intelligence अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या संघर्षात अमेरिकेने अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्याची माहिती समोर आली आहे. एका वृत्तानुसार, युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच अमेरिकन सैन्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अवघ्या २४ तासांत जवळपास हजार लक्ष्यांवर हल्ले केले. सुरुवातीच्या पहिल्या १२ तासांतच इराणमधील विविध ठिकाणांवर सुमारे ९०० क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निवास परिसरावरही प्रहार करण्यात आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केली होती.
 
 
 
Attacks using artificial intelligence
 
या कारवाईत लक्ष्यांची निवड आणि हल्ल्यांची गती वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठा आधार घेण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे सैन्याला अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर लक्ष्य निश्चित करून कारवाई करता आली आणि त्यामुळे इराणला प्रतिहल्ला करण्याची संधी कमी मिळाली. अमेरिकेतील पॅलांटिर या कंपनीने विकसित केलेली ‘मावेन’ नावाची अत्याधुनिक प्रणाली या मोहिमेत विशेष महत्त्वाची ठरली. ही प्रणाली उपग्रह, पाळत ठेवणाऱ्या यंत्रणा आणि इतर लष्करी स्रोतांकडून मिळणाऱ्या मोठ्या प्रमाणातील गुप्त माहितीचे विश्लेषण करते. मिळालेल्या माहितीवर ती तात्काळ प्रक्रिया करून कमांडरांना संभाव्य लक्ष्यांची माहिती देते तसेच त्यांच्या महत्त्वानुसार त्यांना प्राधान्यक्रमही ठरवते.ही प्रणाली अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रावर आधारित असून ती उपलब्ध गुप्त माहितीचे सखोल विश्लेषण करून महत्त्वाची लक्ष्ये ओळखते आणि धोरणात्मक महत्त्व लक्षात घेऊन त्यांची क्रमवारी निश्चित करते. हल्ले सुरू झाल्यानंतर त्या कारवाईचा परिणाम काय झाला याचे मूल्यांकनही ही प्रणाली करते. त्यामुळे लष्करी अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार त्वरित रणनीतीत बदल करणे शक्य होते. या तंत्रज्ञानासाठी अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांमधील भागीदारीमुळे सैन्याला अत्यंत वेगवान आणि प्रभावी निर्णय घेण्यास मदत झाली आहे.
 
अमेरिकन सैन्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत असून ‘मावेन’ प्रणाली त्यातील महत्त्वाचे साधन बनली आहे. मे २०२५ पर्यंत अमेरिकन सैन्यातील वीस हजारांहून अधिक कर्मचारी या प्रणालीचा वापर करत असल्याचे सांगितले जाते. उपग्रह आणि पाळत ठेवणाऱ्या साधनांमधून मिळणारी माहिती तात्काळ समजून घेण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणातील संवेदनशील माहितीचे विश्लेषण करण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरत आहे. त्यामुळे लष्करी निर्णयप्रक्रियेत या तंत्रज्ञानावर अवलंबित्व वाढत चालले आहे. इतकेच नव्हे तर, काही तज्ज्ञांनी या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली असली तरी भविष्यात अमेरिकन सैन्य अशा प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अधिक व्यापक वापर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.