सराफा व्यापार्‍याला मारहाण

दोन भावांवर गुन्हा दाखल

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
चंद्रपूर,
Ballarpur jeweller assault case तीन वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात साक्ष दिल्याबद्दल एका सराफा व्यापार्‍याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना बल्लारपूर शहरात शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

Ballarpur jeweller assault case 
बल्लारपूर शहरातील गणपती वॉर्ड परिसरातील साई अपार्टमेंटमध्ये राहणारे आनंद उर्फ अन्नू चंद्रय्या मातंगी (58) हे बस्ती विभाग गांधी चौक परिसरात अनुराग ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान चालवतात. जवळच सूरज संतोष गुप्ता याचे पान मटेरियलचे दुकान आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास आनंद मातंगी हे दुकान बंद करून घरी जाण्यास निघाले. दरम्यान, ते सूरज गुप्ता याच्या दुकानासमोर उभे राहून एका व्यक्तीशी बोलत होते. यावेळी सूरज गुप्ता याने त्यांच्याशी शिवीगाळ करून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर सूरज गुप्ता आणि त्याचा भाऊ बंटी उर्फ नीरज गुप्ता यांनी मातंगी यांना मारहाण केली. यात मातंगी जखमी झाले. यावेळी मातंगीच्या गळ्यातून अंदाजे 20 ग्रॅम आणि 25 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या तसेच बालाजी लॉकेट असलेली एक साखळी पडली. घटनेची माहिती कळताच मातंगीचा मुलगा अनुराग आणि पुतण्या आशिष कोमटी घटनास्थळी पोहोचले. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला केला आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी सूरज गुप्ता आणि बंटी गुप्ता यांच्याविरुध्द कलम 118 (1), 296, 3 (5) आणि 351 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार करीत आहेत. अभिषेक मालू यांच्या दुकानावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याप्रकरणात मातंगी हा पूर्वी साक्षीदार होता. यावरून सूरज गुप्ता याने यापूर्वीही रागाच्या भरात मला धमकी दिली होती, असे आनंद मातंगी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.