भाजपा आ.गोविंद परमार यांचे निधन

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
सुरत,
BJP MLA Govind Parmar passes away गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आ.गोविंद परमार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. आणंद जिल्ह्यातील उमरेठ विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच राज्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अलिकडच्या काही दिवसांत गोविंद परमार यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना तातडीने आणंद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही आणि अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर पक्षातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.
 
 

भाजप आमदार गोविंद परमार 
 
गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जगदीश विश्वकर्मा यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. उमरेठ मतदारसंघातील लोकप्रिय आणि जनसंपर्क असलेले नेते अशी त्यांची ओळख होती, असे सांगत त्यांनी दिवंगत आत्म्यास शांती लाभो आणि कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच समर्थक, कार्यकर्ते आणि अनेक राजकीय नेते मोठ्या संख्येने त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी पोहोचू लागले.
 
 
१९५३ साली जन्मलेले गोविंद परमार हे मध्य गुजरातमधील अनुभवी आणि प्रभावी राजकीय नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी चार वेळा गुजरात विधानसभेवर निवडून येत जनतेचे प्रतिनिधित्व केले. सुमारे तीन दशकांपूर्वी त्यांनी आणंद जिल्ह्यातील सारसा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रथम विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८ च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरही विजय मिळवत आपला प्रभाव कायम ठेवला. पुढील काळात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर सारसा मतदारसंघ उमरेठमध्ये विलीन झाला. २०१२ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर २०१७ आणि २०२२ या सलग निवडणुकांमध्ये त्यांनी उमरेठ मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवत पुन्हा विधानसभेत स्थान मिळवले. त्यांच्या निधनामुळे गुजरातच्या राजकीय क्षेत्रात एक अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.