आईमुळे घराला घरपण, आता उरल्या घराला फक्त भींती

आईच्या अस्तित्वाची उणिव हृदयात कायम राहील - मुलगा विशालची प्रतिक्रिया

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
bss explosive company घरात अठराविश्व दारिद्र्यात वडिलांसह संसार करणाऱ्या आईने आम्हा दाेन्ही मुलांना काहीही कमी पडू नये म्हणून स्वतः काबाडकष्ट करुन राबली. तिच्या पंखाखाली आम्ही भावंड लहानाचे माेठे झालाे आणि स्वतःच्या पायावर उभे राहिलाे. आता आईला सुखाचे दिवस पाहण्याची वेळ हाेती. मात्र, नियतीने तिला आमच्यापासून हिरावले. आईच्या अस्तित्वाची उणिव हृदयात कायम राहील, अशी भावना एसबीएल कंपनीतील स्फोटात मृत्यू पावलेल्या दुर्गा सेवतकर यांचा मुलगा विशाल याने व्यक्त केली.
 

bss explosive 
 
राऊळगाव येथील बीएसएस एक्सप्लाेसीव्ह कंपनीत 1 मार्चला स्फोट झाला. या स्फोटात 20 जण ठार तर 24 जण गंभीर जखमी झाले. या स्फोटात दुर्गा केशव सेवतकर (46, रा, खातरवाडा) यासुद्धा गंभीर जखमी झाल्या हाेत्या. स्फोटात त्यांचा चेहरा, हात-पाय आणि पाेटाचा भाग जळाला हाेता. जवळपास 75 टक्के जळालेल्या दुर्गा यांच्यावर ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरु हाेता. रुग्णालयाच्या बाहेर चाेवीस तास दुर्गा यांचा मुलगा विशाल हा बसून हाेता. आई बरी हाेईल आणि तिला मी घरी घेऊन जाईल, अशी भाबडी आशा त्याला हाेती. ताे राेज सकाळी आणि सायंकाळी तिला बघण्यासाठी आयसीयूजवळील गल्लीत रेंगाळत राहायचा. अनेकदा त्याला डाॅक्टर आणि सुरक्षारक्षकसुद्धा हाकलून द्यायचे. त्यानंतरही ताे तेथेच रेंगाळायचा. आईवर जीवापाड प्रेम असलेल्या विशालशी संवाद साधला असता त्याच्या डाेळ्यातून घळाघळा अश्रू वाहत हाेते. शेवटी नियतीने डाव खेळला आणि सहा दिवसांनंतर दुर्गा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती आयसीयूमधून बाहेर येताच विशाल काेसळला. धाय माेकलून रडायला लागला. त्याला पैसा नकाे आई हवी हाेती. मात्र, ‘स्वामी तिन्ही जगाचा...आईविना भिकारी‘ अशी स्थिती विशालची हाेती.
डाेक्यावर अक्षदा टाकायचे स्वप्न
दुर्गा यांना विशाल (27) आणि गाैरव (20) अशी दाेन्ही मुले आहेत. गाैरव हा साेलारमध्ये नाेकरीवर आहे तर विशाल माेलमजुरी करताे. पूर्वी विशाल हासुद्धा साेलर कंपनीत कामाला हाेता. परंतु, स्फोट झाल्यानंतर दुर्गा यांनी मुलाच्या जीवाला धाेका नकाे म्हणून विशालला नाेकरी साेडायला लावली.bss explosive company तेव्हापासून ताे आईची सेवा करीत हाेता. यावर्षी विशालचे लग्न उरकून टाकण्याचा विचार दुर्गा यांचा हाेता. विशालच्या डाेक्यावर अक्षदा टाकून सून घरी आणण्यासाठी ती आग्रही हाेती, असे विशाल म्हणताे.
मी खचून गेलाे
आई ही कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावत हाेती. स्फोटात ती जखमी झाल्याचे ऐकताच काळजात धस्स झाले. आता माझे आणि भावाचे कसे हाेणार, असा प्रश्न पडला. मात्र, ती लवकर बरी व्हावी, अशी मनात आशा बाळगून हाेता. घरात खायला काही नसताना ती स्वतः उपाशी राहून आम्हा दाेघांना पाेटभर खाऊ घालणारी आई गेल्यामुळे मी पूर्णतः खचून गेलाे. आईची उणिव मला नेहमी भासेल. आईमुळे चार भिंतीला घरपण हाेते. आता मात्र, आमचे जीव ओसाड असलेले रान झाले आहे, अशी भावना विशालने व्यक्त केली.