जिल्ह्यातील नागरिकांनी महसूल सुविधांचा लाभ घ्यावा - पालकमंत्री संजय राठोड

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ सुरू

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Sanjay Rathodजिल्ह्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना महसूल सेवांचा लाभ गावपातळीवर मिळावा या उद्देशाने राज्य शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान हा लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणारा अत्यंत उपयुक्त आणि जनहिताचा उपक्रम आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे. आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शासन-प्रशासन हे जनतेच्या हितासाठी असले पाहिजे, हा आदर्श घालून दिला होता. न्याय, पारदर्शकता आणि लोककल्याण ही त्यांच्या प्रशासनाची वैशिष्ट्ये होती. त्याच विचारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ‘प्रशासन आपल्या दारी’ ही संकल्पना पुढे नेण्याचे काम जिल्हा प्रशासन करत आहे.
 
संजय राठोड  
आजही ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी वारंवार कार्यालयात जावे लागते. अनेकदा माहितीअभावी किंवा प्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळे त्यांची कामे प्रलंबित राहतात. अशा परिस्थितीत प्रशासनाने स्वतः नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडवणे, ही लोकाभिमुख शासन व्यवस्थेची खरी ओळख आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवार, 7 मार्चपासून 22 मे पर्यंत गावपातळीवर यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुके, प्रत्येक महसूल मंडळ तसेच नगर परिषद स्तरावर ही विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना 15 पेक्षा अधिक महसुली सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
 
या शिबिरांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली फेरफार प्रकरणे निकाली काढणे, सातबारा उताèयातील चुकांची दुरुस्ती करणे, डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा आणि 8-अ उतारे देणे यासारख्या महत्त्वाच्या सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रे मिळविण्याची सुविधाही नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
 
यासोबतच अकृषक (एनए) परवानगी संदर्भातील मार्गदर्शन, सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनासंबंधी प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप आणि ई-मोजणी अर्ज स्वीकारणे यासारखी अनेक कामे या शिबिरांमधून केली जाणार आहेत.
 
या अभियानासाठी प्रशासनाने लोकाभिमुख दृष्टीकोनातून काम करावे. नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने ऐकून त्यांचे त्वरित निराकरण करावे. तसेच हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवून शासनाच्या विविध योजना आणि सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन देखील पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
-----