नाशिक,
Dr. Manisha Jejurkar commits suicide नाशिक शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड सारख्या उच्चभ्रू परिसरात वास्तव्यास होत्या. त्यांनी आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. डॉ. मनीषा या नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील नामांकित मनोविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या पत्नी होत्या.
डॉ. मनीषा जेजुरकर या स्वतः एक उत्तम आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून परिचित होत्या. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असून, ते अनेकांचे मानसिक आरोग्य सावरण्याचे काम करतात. अशा परिस्थितीत त्यांच्याच पत्नीने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.डॉ. मनीषा यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. गंगापूर रोड पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.