सावधान! पुढील दोन दिवसात विदर्भासह राज्यात उष्णतेचा इशारा!

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
मुंबई,
Heat warning including Vidarbha विदर्भासह राज्यभरात उष्णतेचा तडाखा वाढू लागला असून पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या भागात तापमान चाळीशीच्या पुढे जाण्याची शक्यता असून नागरिकांना उन्हापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवसांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही तापमान सामान्यपेक्षा दोन ते तीन अंशांनी जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
 
 
Heat warning including Vidarbha
 
 
दरम्यान,राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती येथे झाली असून येथे ४०.८ अंश तापमान नोंदवले गेले. त्यामुळे विदर्भात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांमध्ये तापमानात सातत्याने वाढ होत राहणार असून महिन्याच्या अखेरीस अनेक भागांमध्ये तापमान चाळीशीच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागातही उष्णतेची तीव्रता वाढू लागली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. परभणी येथे ३८.५ अंश तापमानाची नोंद झाली असून छत्रपती संभाजीनगर येथे ३७.६, बीड येथे ३६.६, धाराशिव येथे ३६.२ आणि उदगीर येथे ३७ अंश तापमान नोंदवले गेले आहे.
 
पश्चिम महाराष्ट्रातही उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात असून सध्या ३५ ते ३७ अंशांच्या दरम्यान तापमान राहिले आहे. सांगली येथे ३७.४, सातारा येथे ३६.१ आणि नाशिक येथे ३६.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत या भागातही तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किनारपट्टी भागातही उष्ण व दमट हवामानाची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून यासाठी सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही पुढील आठवडाभर तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढत जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.