भारताच्या तेल पुरवठ्याचे आकडे जाहीर करणार नाही!

रशियाची स्पष्ट भूमिका

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
मॉस्को,
not release oil supply figures to India मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या निर्यातीबाबतचे तपशील जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, भारताला पुरविल्या जाणाऱ्या तेलाच्या प्रमाणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली जाणार नाही. यामागे स्पष्ट कारणे असून अनेक दुष्टचिंतक या माहितीकडे लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अर्थ विभागाचे प्रमुख स्कॉट बेझंट यांनी भारतीय तेल शुद्धीकरण प्रकल्पांना रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी तीस दिवसांची तात्पुरती मुभा दिल्यानंतर पेस्कोव्ह यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
 
 
 
oil
 
 
दरम्यान, काही भारतीय माध्यमांमध्ये रशिया भारताला आठवड्याला सुमारे बावीस दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा करू शकतो, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र या आकड्यांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास पेस्कोव्ह यांनी नकार दिला.रशियाच्या सरकारी दूरचित्रवाणीवर दाखविण्यात आलेल्या एका नकाशात अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराकडे जाणाऱ्या अनेक तेलवाहू जहाजांचे मार्ग दर्शविण्यात आले होते. ही जहाजे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील तेल शुद्धीकरण केंद्रांकडे जात असल्याचेही सांगितले गेले.
 
रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनीही या घडामोडींवर भाष्य करताना सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर तसेच इराणकडून दिलेल्या प्रत्युत्तरामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. त्यामुळे रशिया भारत आणि चीनला कच्च्या तेलाचा पुरवठा वाढविण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. या घडामोडींनंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याचे सांगितले जाते. जगातील सुमारे वीस टक्के तेल वाहतूक या सामुद्रधुनीतून होत असल्याने त्याचा जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदीसाठी तात्पुरती मुभा दिली आहे. यापूर्वी अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारानुसार भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नये, अशी अट घालण्यात आली होती.