आर.टी.ई. प्रवेशात अंतर मर्यादा घटवून पालकांची कोंडी

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
सेलू,
RTE राज्य शासनाच्या बालकांचा मोफत शिक्षणाचा हक (आर.टी.ई.)मध्ये २५ टक्के ऑनलाईन प्रवेश (२०२६-—२७) प्रक्रियेत एकामागून एक अडथळे उभे राहत आहेत. आधीच तांत्रिक अडचणींनी त्रस्त असलेल्या पालकांच्या अडचणीत आता नवीन अंतर मर्यादेची भर पडली आहे.
 

RTE  
शाळेपासून तीन किलोमीटर परिसरातील रहिवाशी मुलांना प्रवेशासाठी पात्रता होती. मात्र, नव्या नियमांनुसार ही मर्यादा १ किमीपर्यंत कमी करण्यात आली आहे. या बदलामुळे हजारो गरजू व पात्र मुलांना आवडत्या शाळेत प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेषतः ग्रामीण व अर्धशहरी भागात शाळा दूर अंतरावर असताना ही मर्यादा अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील पालकांनी व्यत केली.
 
 
याशिवाय, ऑनलाईन RTE  अर्ज प्रणालीत पोर्टल स्लो आहे, काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा, चूक झाल्यास अर्ज रद्द करून नव्याने भरा अशा सूचनाच दिल्या जात आहेत. कागदपत्रे अपलोड, जन्मतारीख दुरुस्तीला बंदी अशा अटींमुळे सामान्य पालकांसाठी ही प्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. एकदा अर्जात चूक झाली तर दुरुस्तीऐवजी पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागतो. अंतर मर्यादा कमी करणे, तांत्रिकदृष्ट्या कमकुवत पोर्टल आणि अपुरी मार्गदर्शक यंत्रणा‡या सर्वांचा फटका गरीब व वंचित घटकांतील मुलांना बसत आहे.
 
 
तीन किलोमीटरची जुनी मर्यादा पुन्हा लागू करण्यात यावी, अर्जात दुरुस्तीची सुविधा आणि सक्षम तांत्रिक व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली.