समाजाला हवेत अपघातग्रस्त रक्षक!

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
वेध
 
- अनिल उमाकांत फेकरीकर
accident victims protectors कठीण समय येता, कोण कामास येतो, असा वाक्यप्रचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण कठीण समय येता मी कामास येणार, असे ठासून म्हणणारे समाजात निर्माण होण्याचे प्रमाण कमी आहे. तसे पाहता मदत करणे हा मानवाचा स्थायी स्वभाव हवा. मात्र तसे न घडता एखाद्यावर वाईट प्रसंग उद्भवल्यास तमाशा पाहणारेच सभोवताल गोळा होतात. मदतीसाठी एखादाच धावतो. गुरुवार 5 मार्च 2026 रोजी नागपूर जिल्ह्यातील कोराडी-खापरखेडा भागात पती-पत्नीने मिळून एका व्यक्तीची खुलेआम हत्या केली. ही हत्या होत असताना जाणाऱ्या-येणाऱ्यांनी तिथे थांबून त्याचे व्हिडीओ शूटिंग केले, पण मदतीसाठी एकही व्यक्ती धावली नाही. व्हिडीओ तयार करण्यासाठी लोकांजवळ वेळ होता; मग मदतीसाठी का नाही, असा प्रश्न मनात आला. समजा लोक धावले असते तर कदाचित पती-पत्नीच्या हातून घडणारा गुन्हा टाळणे शक्य होते. अशाच स्वरूपात लोक अपघातानंतर व्हिडीओ बनवितात आणि जखमींना सोडून रणछोडदास बनण्यात धन्यता मानतात.
 
 

मारहाण वेध  
 
 
याला माणुसकी म्हणत नाही. आपल्या समाजाला अपघातग्रस्त रक्षकांची गरज आहे. जेव्हा केव्हा अपघातग्रस्त रक्षकांची फौज तयार होईल, तेव्हा या देशात कुठलीही व्यक्ती रस्त्यावर तडफडून मरणार नाही. कुठलेही गुन्हेगार खुलेआम सामान्यांवर हात उगारणार नाहीत. पण तो दिवस खरोखरच या देशात येऊ शकतो का? याचे उत्तर होय असेच देता येईल. याकरिता आपल्याला मुला-मुलींवर लहानपणापासून मदतीचा भाव बिंबवावा लागेल. मदत केल्याने काय आत्मिक समाधान प्राप्त होते, हे त्यांना पटवून द्यावे लागेल. कदाचित पहिल्या वर्गापासूनच सामाजिक कार्य हा विषय त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करावा लागेल. त्यात मुलांना गुण देण्याची पद्धत स्वीकारावी लागेल. गुणांच्या लोभापायी का असेना मुले मदतीसाठी पुढे येतील. कोरोना काळात डॉक्टर, पोलिस, दानशूर लोक, व्यापारी, पत्रकार, राजकीय नेते समाजातील पीडितांसाठी देवदूत म्हणून धावत आले. त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता पीडितांना मदतीचा हात दिला. परिणामी आपण चीननिर्मित कोरोनाला हद्दपार करण्यात यश मिळविले. तसे पाहता समाजात एकता असल्यास कुठलाही गुन्हेगार गुन्हा करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करतो. एवढा धाक समाजाकडून निर्माण होऊ शकतो. पण समाज एकवटण्यास तयारच नाही. समाजात केवळ 2 टक्के लोक दुर्जन आहेत तर उर्वरित 98 टक्के सज्जन आहेत. दुर्दैवाने दुर्जन एकमेकांच्या मदतीला पटकन जातात. सज्जन मात्र स्वत:ला अलिप्त ठेवतात. परिणामी अपघातग्रस्तांना आणि गुन्हेगारांनी केलेल्या हल्ल्यातील पीडितांना मदत मिळत नाही. नंतर मात्र हेच लोक पोलिसांच्या नावाने शिमगा करतात. तसे पाहता जी व्यक्ती स्वत:हून कुणाला मदत करीत नाही, त्यांना कुणावरही ताशेरे ओढण्याचा अधिकार नाही. जी कर्तव्याची पूर्तता करेल तिनेच इतरांकडून अपेक्षा ठेवावी, असाच सृष्टीचा नियम सांगतो. पण अपघातग्रस्त रक्षकांची उणीव सतत राहण्यासाठी जेवढा समाज कारणीभूत आहे, तेवढेच आपल्याकडील कायदे व प्रशासन जबाबदार आहे. वाईट काम केल्यास गावभर बदनामी करणारे जागोजागी आहेत. पण चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करणारे हाती दिवा घेऊनही सापडत नाहीत. जेव्हा चांगले काम करणाऱ्यांना तत्काळ त्याचे फळ मिळेल त्या दिवसांपासून त्यांची संख्या वाढेल, असा माझा दावा आहे. नागपुरात रोडमार्क फाऊंडेशनचे संस्थापक राजू वाघ यांनी अपघातग्रस्त रक्षक तयार व्हावेत याकरिता खास उपक्रमच हाती घेतला आहे. तर सावनेर तालुक्यात कुठेही अपघात घडो, त्यातील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून हितेश बनसोड आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर राहतात. राजू वाघ असो किंवा हितेश बनसोड दोघांनी सुरू केलेली समाजसेवा हटकेच म्हणावी लागेल. पण मग त्यांचे पाहून इतर मंडळी केवळ तमाशा का पाहतात? हत्या होत असताना व्हिडीओ तयार करणाèयांनी पीडिताला वाचविण्याचा प्रयत्न का केला नाही.accident victims protectors आता ते म्हणतील, आम्हाला आमच्या जिवाची भीती होती. मग व्हिडीओ तयार करताना ती भीती कुठे गेली होती, याविषयी आत्मचिंतन व्हावे. असाच प्रकार डॉक्टरांनी, पोलिसांनी कर्तव्यपूर्तीच्या पूर्वी केला तर आपल्याला आवडणार आहे का? मग ज्या समाजात आपण राहतो, त्यांच्या प्रती आपले काहीच कर्तव्य नाही का? ही बाब समजून घ्यावीच लागेल. शेवटी, तो खूप चांगला होता, हा समाजाकडून मिळणारा पुरस्कार माणसाला मेल्याशिवाय भेटत नाही. ही प्राचीन पद्धत समाजाने बदलली तर नक्कीच आपल्याकडेही अपघातग्रस्त रक्षक वाढतील, नाही का?
 
9881717859