यूपीएससीत गोंदियाची दमदार कामगिरी

गोंदियातील श्रवण 275 वा, तर चिचेवाड्याचा हेमकृष्णची 849 वी रँक

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
गोंदिया/मुल्ला,
UPSC result Gondia success, संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत गोंदिया जिल्ह्यातील दोन युवकांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा नावलौकिक देशपातळीवर उजळविला आहे. गोंदिया शहरातील श्रवण ब्रजरतन मूंदडाने 275 वी रँक मिळवली असून देवरी तालुक्यातील चिचेवाडा येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र हेमकृष्ण प्रेमलाल पिसदे याने 849 वी रँक मिळवत यश संपादन केले आहे. शहर आणि ग्रामीण भागातून घडलेली ही दुहेरी कामगिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
 

UPSC result Gondia success, 
गोंदिया शहरातील प्रसिद्ध राधावल्लभ भागीरथ मूंदडा या प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील श्रवण मूंदडाचे प्राथमिक शिक्षण गोंदिया शहरातच झाले. लहानपणापासून अभ्यासू, जिज्ञासू आणि मेहनती स्वभावामुळे त्याने शिक्षणात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली. पुढे त्याने दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून बी.कॉम पदवी प्राप्त केली. त्यानंतर देशातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या आयआयएम कोलकाता येथून एमबीए पूर्ण करत आपल्या शैक्षणिक प्रवासाला अधिक बळ दिले. उच्च शिक्षणानंतरही देशसेवेचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवत त्याने यूपीएससीची तयारी सुरू ठेवली आणि कठोर परिश्रम, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर अखेर या कठीण परीक्षेत 275 वी रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. देवरी तालुक्यातील चिचेवाडा येथील सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील हेमकृष्ण प्रेमलाल पिसदेने देखील यूपीएससी परीक्षेत 849 वी रँक मिळवत उल्लेखनीय यश मिळवले आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत अखंड मेहनत, प्रबळ जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्याने हे यश संपादन केले. हेमकृष्ण पिसदे हे यापूर्वी मुंबई येथे कामगार अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि सध्या धामणगाव (रेल्वे) येथे तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. श्रवण मूंदडा आणि हेमकृष्ण पिसदे यांच्यावर व्यापारी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे गोंदिया जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळले असून जिल्ह्यातील तरुणांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. या यशाबद्दल क्षेत्राचे खासदार अँड. नामदेवराव किरसान तसेच आमदार संजय पुराम यांनी हेमकृष्ण पिसदे यांचे कौतुक करत भविष्यात प्रशासनात कार्य करताना ते समाजात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उल्लेखनीय योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.
हे यश केवळ माझे नसून माझ्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाचे आहे. छोट्या शहरातून मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा मला गोंदियानेच दिली. सातत्याने मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणतेही ध्येय अशक्य राहत नाही. माझे हे यश इतर तरुणांसाठी प्रेरणा ठरेल, हीच अपेक्षा आहे.
- श्रवण मूंदडा
शासकीय सेवेत जाणे हे प्रत्येक युवक-युवतीचे आकर्षण असते. मात्र त्यासाठी स्वतःची आवड आणि क्षमता ओळखणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाच्या कामाचे स्वरूप समजून घेत स्पर्धा परीक्षेकडे वळणे आवश्यक आहे. तसेच इतर क्षेत्रातही अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यांची माहिती घेऊन योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.- हेमकृष्ण पिसदे