शॉर्ट सर्किटमुळे शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला आग

सावरगाव जिरे येथील घटना

    दिनांक :07-Mar-2026
Total Views |
वाशीम,
Washim wheat crop fire incident, वाशीम तालुयातील सावरगाव जिरे येथील शेतशिवारात विद्युत तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीमुळे उभ्या गव्हाच्या पिकाला आग लागून तीन ते चार एकरांतील गहू जळून खाक झाल्याची घटना शनिवारी ७ मार्च रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत अनेक शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून काढणीला आलेले पीक डोळ्यांसमोर जळून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
 

Washim wheat crop fire incident, 
प्राप्त माहितीनुसार, सावरगाव जिरे येथील रिठद रस्त्यालगतच्या शेतशिवारातून विद्युत वितरण कंपनीची वीज वाहिनी गेली आहे. या वाहिनीवरील काही तारा लोंबकळलेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्यात घर्षण होऊन ठिणग्या पडत होत्या. दुपारच्या सुमारास अशाच ठिणगीपैकी एक ठिणगी शेतात पडली. त्या ठिकाणी काढणीसाठी तयार असलेले गव्हाचे पीक असल्यामुळे काही क्षणातच आगीने पेट घेतला आणि आग वेगाने पसरत गेली. आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकरी तत्काळ धावून आले. त्यांनी पाण्याच्या साहाय्याने व इतर साधनांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. शेतकर्‍यांच्या अथक प्रयत्नांमुळे काही वेळाने आग आटोयात आली. मात्र, तोपर्यंत सुमारे तीन ते चार एकरातील गव्हाचे पीक जळून खाक झाले होते.
या आगीत सावरगाव जिरे येथील ओंकार वानखेडे यांचा दीड एकरातील गहू जळून खाक झाला. तसेच दत्ता वानखेडे व सिताराम वानखेडे यांच्या प्रत्येकी एक एकरातील गव्हाचे नुकसान झाले. दामोदर काळे यांच्या शेतातील अर्ध्या एकरांतील गहू आगीत जळून गेला. दरम्यान, इतर शेतकर्‍यांनी तत्परतेने प्रयत्न केल्यामुळे शेजारील काही शेतांतील गहू वाचविण्यात यश आले. याशिवाय श्रीराम सोपान वानखेडे यांच्या शेतातील हळदीच्या पिकासाठी दीड एकर क्षेत्रावर बसविण्यात आलेली ड्रीप सिंचनाची पाईपलाईनही या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. त्यामुळे त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सध्या परिसरात गव्हाची काढणी सुरू असून शेतकरी पीक कापणीच्या कामात व्यस्त होते. अशातच अचानक लागलेल्या आगीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. संबंधित वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याचे सांगत शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनाने पंचनामा करून शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाधित शेतकर्‍यांनी केली आहे.