बुलढाणा,
Buldhana district economy growth कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्ह्याने यंदा महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावर वेगळी छाप उमटवली आहे. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल २०२४-२५ मधील जिल्हानिहाय आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या एकूण आर्थिक उत्पादनात २२.६ टक्क्यांची वाढ नोंदवत बुलढाणा जिल्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला आहे. अवघ्या एका वर्षात जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत जवळपास १० हजार कोटी रुपयांची भर पडल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार बुलढाण्याचे जिल्हा स्तरावरील आर्थिक उत्पादन २०२३-२४ मध्ये ४३,८१५ कोटी रुपये होते. ते २०२४-२५ मध्ये ५३,७३८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. एका वर्षातील ही वाढ केवळ आकड्यांची उडी नसून जिल्ह्यातील उत्पादन, व्यापार आणि ग्रामीण बाजारपेठेतील वाढत्या आर्थिक हालचालींचे द्योतक मानले जात आहे. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांची आर्थिक वाढ साधारणपणे १० ते १३ टक्क्यांच्या दरम्यान असताना बुलढाणा जिल्ह्याने त्यापेक्षा दुप्पट वेगाने झेप घेतली. वाशीम, नाशिक, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर यासारख्या जिल्ह्यांनाही बुलढाणा जिल्ह्याच्या आर्थिक वाढीशी स्पर्धा करावी लागत आहे. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे यासारख्या औद्योगिक व सेवा क्षेत्रावर आधारित मोठ्या शहरांची वाढ तुलनेने कमी राहिली. त्यामुळे राज्याच्या आर्थिक वाढीत ग्रामीण जिल्ह्यांची भूमिका येत्या काळात अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.