चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारत-चीन सहकार्य वाढवण्याचे केले आवाहन

तैवानवर घेतली कडक भूमिका

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
बीजिंग, 
india-china पश्चिम आशियात वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत आणि चीनने परस्पर सहकार्य वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे. बीजिंग येथे झालेल्या राष्ट्रीय लोक प्रतिनिधी सभेच्या अधिवेशनादरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की, भारत आणि चीन एकत्रितपणे काम केल्यास विकसनशील देशांना नव्या आशेचा किरण मिळू शकतो. जगातील अनेक गरीब आणि विकसनशील राष्ट्रांसाठी या सहकार्यामुळे स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
india-china
 
वांग यी यांनी पुढे सांगितले की, पुढील दोन वर्षांत ब्रिक्स गटाच्या अध्यक्षपदाच्या काळात भारत आणि चीनने एकमेकांना पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. या दोन मोठ्या देशांमधील सहकार्यामुळे अनेक विकसनशील राष्ट्रांना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी नवी दिशा मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. india-china पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाबाबतही चीनने चिंता व्यक्त केली. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत हा संघर्ष तात्काळ थांबवण्याची गरज अधोरेखित केली. कोणतेही संकट केवळ बळाच्या आधारे सुटू शकत नाही, त्यामुळे संवाद आणि शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तैवानच्या प्रश्नावरही वांग यी यांनी चीनची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. त्यांच्या मते तैवान हा प्राचीन काळापासून चीनचा अविभाज्य भाग आहे आणि तो स्वतंत्र देश होऊ शकत नाही. चीन कोणत्याही व्यक्तीला किंवा शक्तीला तैवानला चीनपासून वेगळे करण्याची परवानगी देणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. बीजिंगमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत तैवान सामुद्रधुनीतील संभाव्य संघर्ष आणि चीनच्या एकीकरणाच्या धोरणाबाबत विचारण्यात आले असता त्यांनी चीन आपल्या प्रादेशिक अखंडतेचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तैवानला चीनपासून वेगळे करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.