ऐतिहासिक चित्रपट करताना इतिहासाशी प्रामाणिक रहावे

अभिनेता व दिग्दर्शक राहुल सोलापूरकर यांची खास मुलाखत

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
प्रफुल्ल व्यास

वर्धा,
historical films authenticity, महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेतील चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. कारण, ते वास्तवतेवर आधारित चित्रपट तयार करतात. महाराष्ट्रात हिंदी चित्रपटांसोबत मराठी चित्रपटांची स्पर्धा सुरू आहे. अलिकडे एैतिहासिक चित्रपटांवर भर दिल्या जातो आहे. परंतु, त्या इतिहासाची तोडफोड केली जाते. प्रेक्षकांना जे आवडते ते दाखवले जाते. त्यात सत्यता दाखवली जावी. हिंदीची नकल करून मराठी चित्रपटांची पटकथा तयार होणे आम्हाला अपेक्षित नाही आणि ते होऊ नये, असे परखड मत ज्येष्ठ सिने अभिनेते, दिग्दर्शक स्वामी समर्थ चित्रपटात स्वामींची भूमिका साकारणारे राहुल सोलापूरकर यांनी व्यत केले.ते वर्धेत विश्वाल हिंदू संमलेनानिमित्त आले असता तरुण भारत प्रतिनिधी सोबत बोलत होते.
 
 
 historical films authenticity,
राहुल सोलापूरकर पुढे म्हणाले की, इतर राज्यांमध्ये त्यांच्या भाषेला सर्वाधिक प्राधान्य दिल्या जाते. आम्ही बाहेर राज्यात चित्रपट चित्रिकरणाकरिता साऊथमध्ये गेलो होतो. त्यावेळी तेथील लोकं आमचा प्रचंड राग करीत होते. असाच अनुभव इतर राज्यातही येतो. परंतु, आम्ही बंगलोरला चित्रिकरण करीत असताना ४०० हून अधिक चित्रपट करणारे डॉ. राजकुमार आम्हाला हॉटेलमध्ये आले. त्यानंतर आम्ही ज्या हॉटेलमध्ये मुकामाला होतो तेथील व्यवस्थापकांच्या वागणुकीत अचानक बदल झाला. तुकाराम हा चित्रपट कन्नडमध्ये निघाला आणि तो चांगला चालला. त्यानंतर दादा कोंडके यांचे दोन चित्रपट निघाले. परंतु, ते चालले नाहीत. साऊट, नॉर्थमध्ये नट नेते झाले. महाराष्ट्रात मात्र नटांना ती संधी मिळत नाही, अशी खंतही त्यांनी तरुण भारत सोबत बोलताना व्यत केली. मराठी चित्रपटांना अनुदान देण्याची मागणी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सुनील दत्त यांनी केली होती.
अलिकडच्या काळात मराठी चित्रपटांचा भडीमार होतो आहे. सैराट चित्रपटाने १०० कोटींचा व्यवसाय केला. परंतु, सर्व वृत्तपत्रं, दूरदर्शनवर या चित्रपटाच्या जाहिराती झळकल्या. त्यात त्यांचे ४० ते ५० कोटी रुपये खर्च झाले. त्यानंतर त्यांना १०० कोटी मिळाले. मात्र, ८८ वर्षांपूर्वी संत तुकाराम या चित्रपटाने ५ लाख रुपये नफा कमावला होता. त्यात तुमची थिम काय हे महत्त्वाचे असते. मराठी माणसाला आवडणारा चित्रपट करताना मराठीची गळचेपी ही होऊ नये. पुणे, मुंबईत क्रांती ज्योती चालतोच आहे. आपल्याकडे बर्‍याच कथा, कादंबर्‍या आहेत. त्यावर आधारित चित्रपट तयार व्हावे. सोबतच एैतिहासिक चित्रपट तयार करताना इतिहासाशी प्रामाणिक रहा असे ते म्हणाले. बाजीराव मस्तानी चित्रपटात शेवटपर्यंत मस्तानी दाखवली. मुळात तसा ÷उल्लेखच कुठे नाही, असा दावा त्यांनी केला. इतिहासाची तोडफोड केल्यानंतर येणारे चित्रपट म्हणजे अगा असे घडलेच नाही असे म्हणण्याची वेळ येऊ नये. अगदी बालगंधर्व चित्रपटातही तोडमोड झाली आहे. आपण मुस्लिम झालो नाही असे त्यांना लिहून ठेवावे लागले. धार्मिक चित्रपट करताना भतांची आस्था काय आहे ते समजून घ्या त्यानंतर चित्रपटाची निर्मिती करा. लोकांना पटणार्‍या गोष्टी दाखवा. वेगळेपणाच्या नावाखाली हिंदी सोबत स्पर्धा सुरू झाली. पण, हिंदीतील
‘ती’ लाट बदलत चालली आहे. आजपर्यंत आपला खरा इतिहास दाखवल्याच गेला नाही. अलिकडच्या १२-१४ वर्षात खरा इतिहास पुढे येऊ लागला आहे. मात्र, इलेट्रॉनिस मिडियाने सर्व संपवले आहे. सध्या सुरू असलेलं युद्ध हे त्याचे ताजे उदाहरण आहे. शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा असे आपण म्हणत आलो आहोत. आता मोबाईल हे शस्त्र आहे, त्याचा जपून वापर करा असे म्हणण्याची वेळ आली असल्याचेही सोलापूरकर यांनी सांगितले.
...चौकट...
पुणेकरांना हिंदुत्त्व सांगणारं वृत्तपत्र मिळालं
वृत्तपत्रं सृष्टीमध्ये निर्भिड व स्वतंत्र विचाराचे असे सांगितले जात असले तरी ते कुठेतरी जुळले असते. पुण्यात स्वच्छ, चांगले आणि हिंदूत्त्व विचाराच्या वृत्तपत्राची गरज होती. तरुण भारतने सुरुवातीपासुनच हिंदूत्त्व, राष्ट्र सर्व प्रथम हेच जोपासले. तरुण भारतने अर्थकारणन न केल्याने आजपर्यंत त्याला अचडणींचा सामना करावा लागला. आता अर्थकारणाचा घोळ होऊ नये. आम्हा पुणेकरांना उत्तम लिखान, राष्ट्रप्रेमाच्या बातम्या मिळाव्या अशी अपेक्षा व्यत करून त्यांनी तरुण भारत पुणे आवृत्तीला शुभेच्छा दिल्या.