नागपूर,
IIM Nagpur भारतीय प्रबंध संस्थेला मिहानमध्ये व्यावसायिक संकुल उभारण्यासाठी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडून (एमएडीसी) भूखंडाचे औपचारिक वाटप शनिवारी करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत या भूखंडाच्या वाटपाशी संबंधित कागदपत्रांचे हस्तांतरण करण्यात आले.
मिहान सेझ क्षेत्राबाहेरील सेक्टर 21 मधील प्लॉट क्रमांक 14 हा भूखंड 3,455.81 चौरस मीटर क्षेत्रफळाचा असून त्यावरील 2,660.61 चौरस मीटर बांधकाम क्षेत्रासह 1.5 इतका एफएसआय मंजूर आहे. आयआयएम नागपूरच्या वाढत्या व्यापाला पूरक ठरतील अशा विविध व्यावसायिक आणि संस्थात्मक उपक्रमांसाठी या जागेवर व्यावसायिक संकुल उभारण्यात येणार आहे.
या भूखंड वाटपाचे पत्र आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांना जिल्हाधिकारी तसेच एमएडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रस्तावित व्यावसायिक संकुलामुळे आयआयएम नागपूरभोवतीची शैक्षणिक व औद्येगिक परिसंस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल तसेच मिहान परिसराचा शिक्षण आणि उद्योग सहकार्याचे उदयोन्मुख केंद्र म्हणून विकास होण्यास चालना मिळेल. कॅम्पस क्षेत्रालगत व्यावसायिक संकुल बनवणारे भारतातील पहिले प्रबंध संस्थान होईल.