महसूल प्रशासन जनतेच्या दारी १३ तालुक्यांत महाराजस्व समाधान शिबिराचा जागर

एकाच छताखाली १५ विभागांच्या सेवांचा लाभ

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
बुलढाणा,
Maharajsw Samadhan Shibir Buldhana सामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा आज जिल्ह्यातील १३ ही तालुक्यांमध्ये उत्साहात शुभारंभ झाला. या शिबिरांच्या माध्यमातून महसूल प्रशासनाने थेट लोकाभिमुख पाऊल उचलत एकाच छताखाली १५ हून अधिक विभागांच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या.
 

Maharajsw Samadhan Shibir Buldhana 
या अभियानाचे स्वरूप केवळ अर्ज स्वीकारण्यापुरते मर्यादित नसून, प्राप्त अर्जांवर तातडीने कार्यवाही करून एकाच दिवसात सेवा प्रदान करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. विशेषतः शेतकर्‍यांचे प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील त्रुटींचे निराकरण आणि विविध दाखल्यांचे वाटप यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. मंडळ स्तरावर आयोजित या शिबिरांमध्ये शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यात प्रामुख्याने डिजिटल ७/१२ व ८अ वाटप, उत्पन्न, जात व रहिवासी दाखल्यांचे वितरण, किसान नोंदणी,आणि युनिक फार्मर आयडी निर्मिती, संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज, घरकुल योजनेसाठी मंजुरी आणि नवीन रेशन कार्ड प्रक्रिया, आणि आयुष्यमान भारत कार्डांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.
शिबिराच्या सुरुवातीला भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य सादर केले. यातून सातबारा वाटप, विविध दाखले, धनादेश वाटप आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती रंजक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
हे अभियान केवळ आजपुरते मर्यादित नसून १५ मे पर्यंत विविध टप्प्यांत राबवले जाणार असून पुढील टप्पे १४ मार्च, १० एप्रिल, १७ एप्रिल, ४ मे आणि १५ मे रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध भागांत हे शिबिर पार पडेल. प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या जवळच्या मंडळ स्तरावरील शिबिराला भेट देऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.