तीन वर्षांच्या गोजिरीचा जागतिक विक्रम

जर्मन इंटरनॅशनल पेटंट मिळवणारी सर्वात तरुण व्यक्ती

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
विधी शर्मा
नागपूर,
Gojiri Ajinkya Kottawar, नागपूरमधील अवघ्या तीन वर्षांच्या गोजिरी अजिंक्य कोत्तावार हिने जर्मनीकडून मान्यता प्राप्त इंटरनॅशनल पेटंट मिळवत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे ती जर्मन इंटरनॅशनल पेटंट मिळवणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे.
 

three-year-old girl, Gojiri Ajinkya Kottawar, 
१२ डिसेंबर २०२२ रोजी जन्मलेल्या गोजिरीच्या नावावर २० नोव्हेंबर २०२५ रोजी या संशोधनाला अधिकृत पेटंट मंजूर झाले. त्यानंतर या कामगिरीची नोंद ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये “सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय (जर्मन) पेटंट धारक” म्हणून करण्यात आली आहे.गोजिरीच्या नावावर नोंद झालेल्या या संशोधनामध्ये विशेष प्रकारच्या उपकरणाच्या साहाय्याने विविध आकारांचे पाण्याचे (साबणाचे) फुगे तयार करता येतात. या उपकरणात विशिष्ट आकाराचा बेस तयार करण्यात आला असून त्याच्या माध्यमातून त्रिमितीय (थ्री-डी) स्वरूपातील वेगवेगळ्या आकारांचे फुगे तयार होऊ शकतात. या कल्पनेतून विज्ञानातील प्रयोगशीलतेबरोबरच नवकल्पनांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या गोजिरी नागपूरमधील मनीष नगर परिसरातील स्मॉल वंडर प्री-स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे वडील डॉ. अजिंक्य कोत्तावार हे स्वतः संशोधक असून त्यांच्या नावावर ४८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटंट नोंदलेले आहेत. महाराष्ट्रातील ‘फुनसूक वांगडू’ म्हणून त्यांची ओळख आहे. शेती व शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे नाव पद्मश्री पुरस्कारासाठीही सुचविण्यात आले आहे.डॉ. कोत्तावार यांनी यवतमाळ येथे ‘ऊबुंटू’ ही प्रयोगशील शाळा सुरू केली असून ‘प्रयोगातून शिक्षण’ ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे काम ते करत आहेत. गोजिरीसोबत खेळत असताना वेगवेगळ्या आकारांचे पाण्याचे फुगे तयार करणाऱ्या उपकरणाची कल्पना सुचल्याचे डॉ. कोत्तावार यांनी सांगितले. योगायोगाने या संशोधनामुळे अवघ्या तीन वर्षांच्या वयात गोजिरी कोत्तावार हिने जागतिक स्तरावर नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
“तरुण पिढीने केवळ नोकरीच्या मागे न धावता संशोधन आणि नवकल्पनांद्वारे समाजासाठी आदर्श निर्माण करावा, या विचारातून हे संशोधन मी माझी मुलगी गोजिरी हिला समर्पित केले. लहानपणापासून मुलांच्या मनात प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या कुतूहलाला योग्य दिशा दिल्यास भविष्यात मोठी संशोधने घडू शकतात.”
डॉ. अजिंक्य कोत्तावार, गोजिरीचे वडील“गोजिरीला प्रत्येक गोष्ट अनुभवण्याची उत्सुकता आहे. तिला गाणे आणि नृत्याचीही आवड आहे. त्यामुळे शक्य तितक्या विविध उपक्रमांमध्ये आम्ही तिला सहभागी करून घेतो. तिच्या सुप्त गुणांना ओळखून भविष्यात तिला संशोधन क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
प्रांजली अजिंक्य कोत्तावार, गोजिरीची आई