पुन्हा हल्ला केलात तर अमेरिकेला खुली परवानगी; सौदीकडून इराणला थेट इशारा

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
रियाध, 
saudi-warning-to-iran अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने तेहरानला स्पष्ट संदेश दिला आहे. तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक मार्गाला सौदी अरेबिया पाठिंबा देत असला, तरी त्यांच्या देशावर किंवा ऊर्जा केंद्रांवर हल्ले झाल्यास ते कठोर प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

saudi-warning-to-iran 
 
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शेजारील देशांना झालेल्या नुकसानीबद्दल खेद व्यक्त केल्याचे विधान केले होते. या विधानाकडे आखाती देशांतील वाढता रोष शांत करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले गेले. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे इराणच्या सत्ताकेंद्रात मतभेद उघड झाले. saudi-warning-to-iran इराणच्या लष्करी नेतृत्वासह काही धार्मिक नेत्यांनी अध्यक्षांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध केला. त्यामुळे वाढलेल्या वादानंतर अध्यक्ष पेझेश्कियान यांना आपले विधान मागे घ्यावे लागले. दरम्यान, सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या संवादात सौदी अरेबियाने तणाव कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांना पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली.
या चर्चेदरम्यान सौदी अरेबियाने असेही सांगितले की इराणवर हल्ला करण्यासाठी त्यांनी अमेरिकेला आपल्या भूमीचा, समुद्राचा किंवा आकाशमार्गाचा वापर करण्याची परवानगी दिलेली नाही. तथापि, परिस्थिती गंभीर झाल्यास भूमिका बदलू शकते, असा अप्रत्यक्ष इशाराही देण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, जर इराणकडून सौदीच्या भूभागावर किंवा ऊर्जा केंद्रांवर हल्ले सुरूच राहिले, तर रियाधला अमेरिकन सैन्याला त्यांच्या तळांचा वापर करण्याची परवानगी द्यावी लागू शकते.
प्रिन्स फैसल यांनी देशाच्या महत्वाच्या ऊर्जा सुविधांवर हल्ले झाल्यास सौदी अरेबिया कठोर प्रत्युत्तर देईल, असेही स्पष्ट केले. दरम्यान, फेब्रुवारीच्या शेवटी इराणच्या अणुकार्यक्रमावरील चर्चा खंडित झाल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केल्याचे सांगितले जात आहे. saudi-warning-to-iran या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया त्यांच्या राजदूतामार्फत तेहरानशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
गेल्या आठवड्यात संयुक्त अरब अमिराती, कुवेत, कतार, बहरीन आणि सौदी अरेबियावर इराणकडून मानवरहित विमान आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांचे वृत्त समोर आले आहे. संघर्षाच्या सुरुवातीच्या काळातच इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर इराणने इस्रायल आणि आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली.
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरघची यांनी एका निवेदनात म्हटले की, सौदी अरेबियाने इराणवर हल्ला करण्यासाठी आपली जमीन, समुद्र किंवा आकाशमार्ग वापरण्यास परवानगी देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी असेही सांगितले की, इराणच्या अंतरिम नेतृत्व परिषदेने शेजारील देशांवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला आहे, जोपर्यंत त्या देशांकडून इराणवर हल्ला होत नाही. तसेच इराणच्या कारवाईमुळे प्रभावित झालेल्या देशांची त्यांनी वैयक्तिकरित्या माफी मागितली होती. मात्र अंतर्गत विरोधानंतर त्यांनी नंतर हे विधान मागे घेतले.