विद्युत तारेच्या घर्षणाने गहू खाक

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
तिवसा,
electric spark कृषी पंपासाठी उभारण्यात आलेल्या विद्युत विभागाच्या नादुरुस्त लोंबत्या तारांमधून स्पार्किंग होऊन शिरजगाव मोझरी येथील अरविंद डफळ यांच्या शेतातील दोन एकरातील गहू जळून खाक झाला. शनिवारी दुपारी १२.४५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान शेजारच्या शेतकर्‍यांना आगीची माहिती मिळताच स्प्रिंकलरच्या सहाय्याने आणि अन्य मानवी उपायांची गव्हाच्या पिकात लागलेली आग तब्बल अर्ध्या तासानंतर रोखण्यात शेतकर्‍यांना यश आले. मात्र तोपर्यंत २ एकरातील गहू जळून खाक झाला.
 

wheat crop fire due to electric spark Maharashtra 
अरविंद गोपाळ डफळ यांचे मौजा कोळवण येथे शेत असून त्यात रब्बीच्या पिकांमध्ये गव्हाची लागवड केली होती. कर्ज आणि ऊसनवारी घेऊन गव्हाची लागवड केली होती. येत्या ५ दिवसात गहू कापणीला आला होता. मात्र त्यापूर्वीच विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे लोंबलेल्या तारांमधून स्पार्किंग होऊन आगीचे गोळे गव्हाच्या उभ्या पिकावर पडून पीक जळून खाक झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे. लोंबलेल्या तारांच्या विरोधात शेतकर्‍यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहे; मात्र, विद्युत विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथून पुढेही अशा आगीच्या घटना होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर विद्युत विभागाचे अभियंता मिश्रा यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. घटनेची तहसीलदार मयूर कळसे आणि तलाठी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तक्रार केली आहे. त्यामध्ये विद्युत विभागाकडून कृषी पंपाच्या खांबावरील तारा दुरुस्ती करणे, ट्री कटिंग करणे आणि पीडित शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.